श्री हनुमानाच्या मूर्तीचे पूजन
पुणे- श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक आणि सकाळी ६.३० वाजता ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन झाले. याशिवाय उत्सवात ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांची कीर्तनमाला, लळीत आणि पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळाही पार पडला.
श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे आणि दागिने घालण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली.
या वेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले आदींसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.