श्रीरामनवमीचा उत्सव देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा झाला; पण महाराष्ट्रात या उत्सवाला गालबोट लागले, ते २९ मार्चच्या रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या दंगलीमुळे ! २८ मार्चच्या रात्री पाळधी (जळगाव) येथेही दंगल घडवण्यात आली. दोन्ही दंगलींचे स्वरूप अतिशय हिंसक आणि तीव्र होते. या दंगली घडवल्या कुणी ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही; कारण दंगल म्हटली की, तिचे सूत्रधार हे धर्मांधच असतात. ते प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सण-उत्सवांतील आनंद हिरावून घेतात आणि हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक असूनही उद्दामपणा गाजवतात. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत आल्यापासून या दंगलींचे प्रमाण काही अंशी न्यून झाले आहे; पण त्या पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. क्षुल्लक कारणांवरून त्या उग्र रूप धारण करतात आणि मग त्यात हिंदु होरपळला जातो. अशा दंगलींच्या वेळी किंवा धर्मांधांकडून हिंदूंवर केले जाणारे अत्याचार किंवा अन्याय यांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ सरकारने हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे, त्यांना आधार द्यायला हवा, तरच हिंदूंना सरकारविषयी विश्वास वाटेल.
हिंदूंवर केली जाणारी दडपशाही !
जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगली सर्वांना समजल्या, त्या प्रसार आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या द्वारे ! वृत्तवाहिन्यांनीही त्याविषयीची वृत्ते दाखवली; पण त्यांनी त्या दंगलींची भीषणता किंवा दाहकता दाखवण्याचे टाळले. जे सत्य आहे, ते उघडपणे, छातीठोकपणे, निर्भीडपणे का सांगितले जात नाही ? कोणतीही घटना ‘जशी आहे तशी’ मांडणे याला ‘वस्तूनिष्ठ पत्रकारिता’ म्हणतात. मग माध्यमे असोत किंवा वृत्तवाहिन्या असोत, ते अशी पत्रकारिता का करू शकत नाहीत ? त्यांना हिंदूंविषयी काहीच देणे-घेणे नाही का ? हिंदूबहुल भारतातच काय, तर हिंदूबहुल महाराष्ट्रातही हिंदूंविषयी संवेदनशील असणार्या घटना १०० टक्के स्वरूपात दाखवल्या न जाणे, हा हिंदूंवर केला जाणारा अन्याय आणि दडपशाहीच आहे. वास्तवात घडलेल्या १० ते १२ भीषण घटना सोयीस्कररित्या टाळून केवळ ४ – ५ घटना मोघम स्वरूपात दाखवून अर्धे सत्यच हिंदूंच्या माथी मारले जात आहे. ही वृत्तवाहिन्यांचीही दांभिकता आहे. राज्यात, तसेच देशातही आपल्या प्रतिमेला कुठेही बाधा पोचता कामा नये, याची काळजी ही माध्यमे अगदी आवर्जून घेत असतात. एरव्ही ‘धर्मकारण मध्ये आणू नका’, असे मुद्दामहून सांगितले जाते; पण हिंदु-मुसलमान वादाचा प्रश्न आला की, या सर्वच माध्यमांचे पारडे नेहमीच मुसलमानांच्या बाजूने झुकलेले असते. वाहिन्या किंवा माध्यमे काय दाखवतात आणि काय लपवतात ? हे हिंदूही जाणून आहेत. धर्माच्या बाजूने असणार्या हिंदूंची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे हिंदू धार्मिकदृष्ट्या सूज्ञ झालेले आहेत, हे सरकार, सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) आणि धर्मांध या सर्वांनी लक्षात ठेवावे. हिंदुविरोधी कृत्यांना हिंदू आता बधणार नाहीत. हिंदू केवळ जागृत नव्हे, तर संघटितही होत आहेत, हेही आश्वासक आहे.
वृत्तवाहिन्यांचा दुटप्पीपणा !
‘प्रक्षोभ उसळू नये; म्हणून आम्ही सविस्तर वृत्त देण्याचे टाळत आहोत’, अशी लंगडी भूमिका घेत काही वृत्तवाहिन्यांनी ‘आम्ही हिंदूंचे कैवारी आहोत’, असे दाखवण्याचाही प्रयत्न केला. हिंदूंनी हे मान्य केले असले, तरी येथे एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे इतक्या प्रक्षोभक बातम्या तर जाऊच देत; पण देशात प्रतिदिन हिंदूंवर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, हिंदु मुलींवर धर्मांधांकडून केले जाणारे बलात्कार या घटना जनतेसमोर प्रतिदिन का आणल्या जात नाहीत ? कि या घटनांची वृत्ते मिळूनही त्या उघड करण्याचे सोयीस्कररित्या टाळले जाते ? छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीच्या वेळी एका ठिकाणच्या मंदिरात आरती चालू आहे, हे एका वाहिनीने दाखवले. जणू काही ‘सर्व ‘आलबेल’ (चांगले) आहे’, असे दाखवण्याचाच हा खोटा प्रयत्न होता. याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी तेथील श्रीराममंदिरात जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. याविषयीचा व्हिडिओ अनेक वृत्तवाहिन्यांकडून प्रसारित केला गेला. यातून जलील यांची हिंदूंविषयीची (खोटी) संवेदनशीलता हिंदूंच्या माथी मारली गेली; पण ‘मंदिराबाहेर दंगल चालू असतांना स्वतःच्या धर्मबांधवांना सांगून ती थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले नाही’, याविषयी वाहिन्यांनी काहीच सांगितले नाही वा त्यांना तसे आवाहनही केले नाही. जलील यांचा उघडपणे दिसणारा हा ढोंगीपणा वाहिन्यांनी समाजाला का नाही दाखवला ? आवाहने ही काय केवळ हिंदूंसाठीच आहेत का ? हो; कारण हिंदू सहिष्णु, असंघटित आणि अज्ञानी आहेत म्हणूनच ना ? पण नाही ! आता हिंदू असे राहिलेले नाहीत. ‘जलील यांनी काय करायला हवे होते आणि वाहिन्यांनीही काय दाखवायला हवे होते ?’, हे हिंदू चांगलेच ओळखून आहेत. पत्रकारितेच्या तत्त्वांना तिलांजली देत वाहिन्या आणि माध्यमे हिंदूंसमोर स्वतःचीच नाचक्की करून घेत आहेत. स्वतःचीच विश्वासार्हता अल्प करत आहेत. हे त्यांना कळेल तो सुदिन !
हिंदूंच्या संरक्षणाच्या दृष्टीने वृत्ते दाखवण्याचे टाळणार्या आणि हिंदू बहुसंख्यांक असतांनाही अल्पसंख्यांकांचीच पाठराखण करणार्या अशा वृत्तवाहिन्या हिंदूंनी तरी का पहाव्यात ? ‘वाहिन्यांनी नीट दाखवल्यासच हिंदू डोळे उघडून नीट पाहू शकणार आहेत आणि ते पाहिल्यासच तो जागृत होऊन एक पाऊल पुढे टाकणार आहे’, हे वास्तव वाहिन्यांनी लक्षात घ्यावे. सत्यान्वेषी पत्रकारिता करण्याचा आणि ती जोपासण्याचा प्रयत्न करावा ! हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचारांना म्हणजेच हिंदुत्वाला दाबले जाते, याहून मोठे दुर्दैव कसले ? ‘वृत्तवाहिन्या किंवा सामाजिक माध्यमे यांच्याकडून हिंदुत्व जोपासले जाते ना’, हे पहाण्याचे दायित्व आपले आहे’, याकडे हिंदुत्वनिष्ठ शासनाने लक्ष द्यावे, ही हिंदु धर्मप्रेमींची अपेक्षा !
हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी ! |