‘पंजाबमध्ये खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात कारवाई चालू झाल्याने पूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. अमृतपालचे काका आणि त्याचे प्रमुख सहकारी यांच्यासह १५० हून अधिक लोकांना अटक झालेली आहे. याला ‘पूर्णपणे उपाययोजना झाली’, असे म्हणण्याऐवजी ‘उशिरा उपाययोजना झाली’, असे म्हणता येईल. अमृतपालच्या कारवायांमुळे गेली ६ मास संपूर्ण पंजाब आणि त्याच्यावर नजर ठेवणारे यांना भयभीत केले होते. अमृतपालच्या कारवाया आधीच कठोरपणे थांबवल्या असत्या, तर येथपर्यंत वेळ आली नसती. त्याच्यावर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एन्.एस्.ए.)’ लावून ‘लुकआऊट’ नोटीस घोषित करावी लागली. हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पंजाब सरकार आणि आम आदमी पक्ष यांना मारण्यात आलेले कडक ताशेरे अप्रिय वाटले असतील; परंतु सत्य तर हेच आहे. ‘या प्रकरणी ८० सहस्र पोलीस काय करत होते ?’, असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला.
१. अमृतपालवर कारवाई न करण्याची पंजाब सरकारची आत्मघातकी वृत्ती
२३.२.२०२३ या दिवशी अमृतसर जिल्ह्यातील अजनाला ठाण्यातील दृश्य मोठी दहशत निर्माण करणारे होते. त्या दिवशी सहस्रो लोक पोलीस ठाण्याला घेरून पोलिसांवर विटा आणि दगड फेकत होते. त्यावर सर्वप्रथम विश्वास बसणे कठीण होते. अमृतपाल याचे सहकारी मोठ्या संख्येने येऊन गोंधळ घालतील, याची सूचना गुप्तचर विभागाला नव्हती, असे नाही. हे संकट पाहूनही पंजाब सरकारने कारवाई न करण्याची धोकादायक आत्मघातकी प्रवृत्ती ठेवली. पोलीस ठाण्यावर आक्रमण झाल्यानंतर पोलिसांनी खलिस्तानी नेता तुफान सिंह याला सोडून देण्याची घोषणा केली. तेव्हा पूर्ण देशाला आश्चर्य वाटले. त्याच्यावर अपहरण करून मारहाण करण्याचा आरोप होता. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची सुटका करण्यात आली, तेव्हा पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध केला नाही. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचे म्हणणे होते की, अमृतपालने दिलेल्या माहितीनुसार तुफान सिंह हा घटनास्थळी नव्हताच. याचा अर्थ पोलिसांनी अमृतपालच्या साक्षीला मान्यता दिली होती. पोलिसांनी आता जी कठोर कारवाई केली, ते पहाता हे यापूर्वीही होऊ शकले असते.
जम्मू-काश्मीरनंतर पंजाब हे पाकिस्तान सीमेवरील असे राज्य आहे की, जेथे हिंसाचार आणि आतंकवाद यांनी संपूर्ण देशाला पुष्कळ काळ सतावले आहे. तेथे आतंकवादामुळे अनुमाने ७० सहस्र लोकांनी जीव गमावला आहे. पाकिस्तानकडून रचली जाणारी षड्यंत्रे, तसेच अमेरिका, युरोप आणि अन्य देशांतील आतंकवाद्यांकडून मिळणारे साहाय्य या गोष्टी लक्षात घेऊन भगवंत मान सरकारने सुरक्षा व्यवस्थेला प्रथम प्राधान्य द्यायला हवे होते. खलिस्तानचा झेंडा घेऊन रस्त्यावर घोषणा देणार्या लोकांना पोलीस संरक्षण देत असल्याचे सर्व देशाने पाहिले आहे. त्यामुळे आतंकवाद्यांसह संपूर्ण जगामध्ये भारताच्या विरोधात असलेल्या लोकांचा उत्साह वाढला असेल. अमृतपाल गेल्या वर्षी सप्टेंबर मासात दुबईहून आला आणि हळूहळू त्याला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. असे का झाले ?
तो पंजाबमधील स्थिती बिघडवत आहे, याची तेथील सर्वसाधारण जनतेला जाणीव होती. ‘सरकारला याविषयी माहिती नव्हती का ? जेव्हा दमदमी टकसाल येथे अमृतपाल याला भिंद्रेनवालेची गादी दिली जात होती, तेव्हा त्याची माहिती सरकारपर्यंत निश्चितच पोचली असणार. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्या ठिकाणचे संपूर्ण दृश्य भयभीत करणारे होते. त्यामुळे या कार्यक्रमात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती. त्याकडे सरकारने डोळेझाक का केली ?’, असा प्रश्न उपस्थित होतो.
२. पंजाबला स्वायत्त प्रदेश घोषित करण्याची खलिस्तान्यांची ५० वर्षांची मागणी
राज्य आणि केंद्र येथील गुप्तचर विभागाने ‘आप’ सरकारचे प्रमुख अन् मुख्य पोलीस प्रशासन अधिकारी यांना पंजाबमध्ये, तसेच पंजाबच्या बाहेर चाललेल्या हालचालींविषयी सूचित केले नव्हते, असे होऊ शकत नाही. अमृतपाल हा अचानक दुबईहून पंजाबमध्ये परततो आणि हळूहळू नायक बनतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्या बोलण्याची पद्धत आणि त्याचे विचार यांवरून त्याला पूर्णपणे सिद्ध करून पंजाबमध्ये पाठवल्याचे स्पष्ट होते. तो ‘आनंदपूर टास्क फोर्स’ सिद्ध करत होता, असे म्हटले जात आहे. पंजाबवर काम करणारे जाणतात की, वर्ष १९७३ पासून आनंदपूर साहिब प्रस्तावाने सध्याच्या खलिस्तान आंदोलनाला चालना मिळाली होती. त्यात पंजाबला ‘स्वायत्त प्रदेश’ घोषित करण्याची मागणी केली गेली होती. त्यात ‘संरक्षण, परराष्ट्र्र धोरण, संचार आणि मुद्रा असे विभाग सोडून सर्व अधिकार राज्याला देण्यात यावे’, अशी मागणी करण्यात आली होती. २४ जुलै १९८५ मध्ये उदारमतवादी लोकप्रिय संत हरचरण सिंह लोंगोवाल आणि राजीव गांधी यांच्यात समेट झाला होता; परंतु त्यात पंजाबची स्वच्छता करण्याविषयीची गोष्ट नव्हती. आतंकवाद्यांनी लोंगोवाल यांची एका गुरुद्वारामध्येच हत्या केली.
३. अमृतपालचे व्यसनमुक्ती केंद्र बनले सेना उभारणीचे ठिकाण !
अमृतपालच्या मागे उभ्या असलेल्या शक्तींनी अशाच प्रकारे पंजाबला आगीत ढकलण्याचे षड्यंत्र रचून दुबईहून पाठवले असावे. त्याने नियोजनबद्धपणे पंजाबमध्ये समाजाच्या व्यसनविरोधी विचारांवर लक्ष केंद्रीत केले आणि ठिकठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रे उघडली. त्यात त्याने युवकांना सहभागी करून घेतले आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे त्याच्याकडे युवक येत राहिले. त्याने व्यसनमुक्ती मोहिमेसह ‘वारिस द पंजाब’ (पंजाबचे वारसदार) या संघटनेवर मिळवलेले नियंत्रण बरेच काही सांगून गेले. त्याच्या समवेतच्या युवकांनी कायद्याच्या राज्यात सहन न होणारी कृत्ये करण्यास प्रारंभ केला. ते सिगारेट ओढणारे आणि तंबाखू सेवन करणारे यांना उघडपणे मारहाण करू लागले. अमृतसर येथे निहंग शिखांनी एका युवकाला मारहाण करून ठार मारले. अमृतपालसाठी व्यसनमुक्ती केंद्र हे त्याची स्वतःची सेना बनवण्याचे ठिकाण बनले. अमृतपालचे सहकारी हिंसाचार, तोडफोड आणि दंगल यांचे माध्यम बनले होते. त्यामुळे त्याचे कार्यक्रम जागोजागी लोकांमध्ये भय उत्पन्न करत होते. अलीकडेच कॅनडाहून निहंग बनण्यासाठी आलेल्या एका युवकाला निहंग शिखांनी ठार मारल्याची बातमी आली. हा युवक त्यांच्या हुल्लडबाजीला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. एक वेळ अशी होती की, कोणत्याही निहंग शिखाला पाहून लोकांना सुरक्षित वाटत होते. आता परिस्थिती पालटली आहे.
४. खलिस्तान समर्थक सिमरनजीत सिंह यांचा विजय हा पंजाबमध्ये वाढत असलेल्या धोकादायक मनोवृत्तीचा परिणाम !
प्रत्यक्षात पंजाबची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. अमृतपाल पकडला जाणे आवश्यक आहे; कारण त्यावरून देश-विदेशांतील कोणत्या शक्ती त्याच्या पाठीशी आहेत ? हे समजेल. यासमवेतच पंजाबची स्थिती सुधारण्यासाठी अजून बरेच काही करण्याची आवश्यकता आहे. भगवंत मान मुख्यमंत्री बनल्याने रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा जागेवर खालिस्तान समर्थक सिमरनजीत सिंह यांचा विजय का झाला ? पंजाबमध्ये वाढत असलेल्या धोकादायक मनोवृत्तीचा तो परिणाम होता. कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात देहली, पंजाब, तसेच अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन याठिकाणी खालिस्तानवाद्यांच्या कारवाया दिसून येत होत्या. संगरूर निवडणूक प्रचाराच्या वेळी येणार्या बातम्यांमधून सिमरनजीत सिंह यांना विजयी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होत आहे, असे वाटत होते.
५. अमृतपालच्या विचारांनी प्रभावित सहस्रो लोकांना मुख्य प्रवाहात आणणे, हा पंजाबसमोरचा मोठा प्रश्न !
याविषयी केलेल्या विश्लेषणातून पंजाबातील फुटीरतावाद आणि हिंसाचार यांची इच्छा धरणार्यांनी सिमरनजीत सिंह यांच्या वयाचा विचार करता ते नेतृत्व देण्यास सक्षम नसल्याचे समजले. त्यामुळे अमृतपाल सिंह याचे महत्त्व वाढले. जर्नेलसिंह भिंद्रेनवाले यालाही उदयास येण्यास वेळ लागला होता; परंतु अमृतपाल दुबईहून आल्यावर दोन ते अडीच मासातच या प्रवाहातील एक परिचित आणि प्रभावी व्यक्ती बनला. हे सर्वकाही असेच घडत नाही. अमृतपालला आधीच थोपवले असते, तर त्याच्यामागे युवकांची एवढी मोठी सेना उभी राहिली नसती. सहस्रो लोक आणि सर्वसाधारण जनता त्याच्या विचारांनी प्रभावित झाली असेल, तर त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणायच ? हा मोठा प्रश्न पंजाबसमोर उभा आहे.
६. अमृतपाल आणि त्याचे सहकारी यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी राजकीय नेतृत्वाच्या विचारांची दिशा पालटणे आवश्यक !
भगवंत मान सरकार आतापर्यंत स्थिर अशा पोलीस महासंचालकांची नियुक्ती करू शकलेले नाही. आतापर्यंत तात्पुरती नियुक्ती करून काम चालवले जात आहे. ही परिस्थिती पालटली पाहिजे. जोपर्यंत पोलीसदलाला योग्य पद्धतीने नियुक्त केलेले पोलीस महासंचालक मिळत नाहीत, तोपर्यंत पोलिसांना योग्य नेतृत्व मिळू शकत नाही. एवढेच नाही, तर भविष्याच्या दृष्टीने आधीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अजनाला येथे अमृतपालच्या लोकांनी ज्या पद्धतीने पवित्र ‘गुरुग्रंथ साहिब’चा ढालीसारखा वापर करून प्रवेश केला, ते पहाता पंजाबमध्ये त्यांच्याविषयी अप्रसन्नता आहे. या अप्रसन्नतेचा लाभ सरकार, तसेच पंजाबमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांना मिळेल. पंजाबातील बहुसंख्य लोक फुटीरतावादाच्या बाजूने कधी नव्हते आणि पुढेही असू शकत नाही. कोणत्याही सरकारसाठी ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. प्रशासन फुटीरतावादी, हिंसक, लंपट आणि हुल्लडबाजी करणार्या गटांच्या विरोधात कठोरतेने वागले, तरच त्यांना समाजाचा पाठिंबा मिळेल. अमृतपाल आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात कारवाई केल्याचा तात्पुरता परिणाम होईल; पण राजकीय नेतृत्वाच्या विचारांची दिशा पालटल्यावरच पोलीस प्रशासन पंजाबच्या दृष्टीने अनुकूल असलेली भूमिका बजावू शकेल.’
लेखक : अवधेश कुमार
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी)
देशात ठिकठिकाणी वाढत असलेल्या फुटीरतावादावर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई न करणे हा आत्मघातच ! |