एका सत्संगात माझ्याकडून झालेल्या चुकांची मला जाणीव करून दिली. त्यानंतर माझ्या मनात नकारात्मक विचार येऊन मला निराशा आली होती. व्यक्तीला निराशा येते, त्या वेळी तिचे मन आणि बुद्धी तिला ‘मीच कसे योग्य आहे ?’, या विचारांभोवती फिरवत रहाते. त्यामुळे तिची ‘मी कुठे चुकले ?’, हा विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. माझीही स्थिती तशीच होती. या स्थितीतून मला बाहेर काढण्यासाठी सद़्गुरु सत्यवान कदम यांनी (सद़्गुरु दादांनी ) साहाय्य केले.
१. योग्य प्रकारे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून घेणे
ते माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. त्यांनी मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू अन्य साधकांना सांगायला सांगून अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याची माझ्या मनाची सिद्धता करून घेतली. त्यांनी मला माझ्याकडून झालेल्या चुका फलकावर लिहायला सांगितल्या आणि चुकांसाठी प्रायश्चित्त घ्यायला सांगितले. ते त्या संदर्भात माझा आढावाही घेत असत.
२. संतांच्या गोष्टी सांगून साधकाला ताण येऊ न देता बाहेर काढणे
सदगुरु दादा मला प्रतिदिन त्यांच्या समवेत चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घेऊन जायचे. त्या वेळी ते मला अनेक संतांच्या गोष्टी सांगत, तसेच ते मला ‘परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’, याविषयी सांगत असत. ते एवढ्या सहजतेने सांगत की, ‘ते माझ्या चुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत आहेत’, हे बर्याच वेळाने माझ्या लक्षात येत असे. त्यांचे बोलणे ऐकतांना मला कुठलाही ताण जाणवत नसे आणि प्रयत्न करायला प्रोत्साहनही मिळत असे. मला एकाच ठिकाणी जाण्याचा कंटाळा येऊ नये, यासाठी ते प्रतिदिन मला वेगवेगळ्या ठिकाणी चालायला नेत असत.
३. समवेत ठेवून चैतन्याच्या स्तरावर लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे
ते मला शक्य होईल, तितका वेळ समवेत ठेवून मला त्यांच्या चैतन्याचा लाभ मिळवून द्यायचा प्रयत्न करत होते, जेणेकरून माझ्यावरील आवरण दूर होऊन मला प्रयत्न करण्यासाठी चैतन्याच्या स्तरावर बळ मिळेल.
‘त्यांनी मला नकारात्मक स्थितीतून अलगदपणे कसे बाहेर काढले ?’, हे माझ्या लक्षातही आले नाही. त्यांनी मला त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अपार कष्ट घेतले, त्याबद्दल मी त्यांच्या आणि प.पू. डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२३)
सद़्गुरु सत्यवान कदम यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन ! साधना करतांना स्वतःमध्ये दुसर्याला विचारून करण्याची वृत्ती निर्माण करावी (प.पू. डॉक्टरांचे प्रश्नांची उत्तरे मिळवण्यातील टप्पे !)साधना करत असतांना आपल्यात सतत विचारून करण्याची वृत्ती निर्माण करायला हवी . ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे कुणाला तरी विचारून घ्यायला हवे. असे केल्याने आपल्या साधनेची होणारी हानी टाळता येते. पुढे आपली साधना वाढल्यावर आपल्याला आतूनच सर्व कळायला लागते. प.पू. डॉक्टरही स्वतःच्या मनात येणारे सर्व प्रश्न प.पू. बाबांना (प.पू. भक्तराज महाराज यांना) विचारण्यासाठी लिहून ठेवायचे आणि प.पू. बाबा जेथे असतील, तेथे जाऊन त्यांचे शंकानिरसन करून घ्यायचे. ते असे सातत्याने करायचे. नंतर प.पू. बाबांनी त्यांना सांगितले, ‘‘आता तुम्हाला इकडे यायची आवश्यकता नाही. तुम्हाला आतूनच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.’’ गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर आपल्याला आपोआपच आतून कळायला लागते. ‘गुरूंच्या मनामधे आपली प्रगती व्हावी’, असा संकल्प होण्यासाठी सातत्याने विचारून साधना करायला हवी आणि साधनारत असायला हवे.’ – संग्राहक : श्री. दिनेश शिंदे |
|