सावरकरांचा अवमान हा देशद्रोह असल्याचे प्रतिपादन !
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – आमच्या गटातील नेत्यांना गद्दार संबोधले जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून त्यांचा सतत अवमान केला जात आहे. हेे आम्ही कदापि सहन करणार नाही, तसेच आम्हाला खोके म्हणणे, मिंधे गट म्हणणे कोणत्या आचारसंहितेत बसते ? सावरकरांचा अवमान हा देशद्रोहच आहे. आमदारांनी सभागृहाचे पावित्र्य जपावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत केले. या वेळी शिंदे आक्रमक झाले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत विरोधकांना वरील खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या आमदारांच्या विरोधात ८ मास आंदोलन करून अवमानकारक घोषणा दिल्या जात आहेत. ते आम्ही सहन करत आहोत. त्यामुळे कारवाई करायची असेल, तर असा अवमान करणार्या सर्वांवर केली पाहिजे. आम्ही बोलत नाही, याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही, असा होत नाही. सभागृहाबाहेर राष्ट्रीय नेत्यांच्या विरोधात कुणीही बरळले, तर त्याला सर्वांनी (सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी) आक्षेप घ्यायला हवा. पंतप्रधान मोदी यांनी देशाची कीर्ती जगभर पसरवली. स्वतःच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार करून त्यांनी लगेच नित्याकामे चालू केली. जी २०चे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा केला जातो. लोकशाही धोक्यात असेल, तर काँग्रेसने भारत जोडो यात्रा कशी काढली ? आम्ही माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा जसा मान राखतो, त्याप्रमाणे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मान राखायला हवा.