महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !

भव्य शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !

मुंबई – कोरोना महामारीनंतर या वर्षी राज्यांतील विविध शहरांत निघालेल्या शोभायांत्रांच्या माध्यमातून हिंदूंनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहात केले. लेझिम, ढोल-ताशे, शस्त्र चालवण्याची प्रात्यक्षिके, पारंपरिक वेशभूषेतील उत्साहमूर्ती हे प्रतीवर्षीप्रमाणे या वर्षीही शोभायांत्रांमध्ये पहायला मिळाले. याखेरीज यंदा ‘विविध विषयांवर प्रबोधन करणारे फलक’ हे शोभायात्रांचे वैशिष्ट्य ठरले. अनेक ठिकाणी अतिशय उंच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. महिलांचा सहभाग सर्वच ठिकाणी अधिक होता.

१. मुंबई

दादर आणि गिरगाव येथे भव्य शोभायात्रा निघाल्या. यंदाच्या शोभायात्रेत वैशिष्ट्यपूर्ण लिखाण असलेले फलक हातात धरण्यात आले होते. ‘महाराजांसारखे दिसायला आवडतं; पण त्यांच्यासारखं वागायला कधी शिकणार ?’ असा फलक एकाने हातात धरला होता, तर ‘चित्रपटगृहात इतिहास पहायला आवडतो; तोच इतिहास वाचायला आणि जपायला का आवडत नाही ?’, तसेच स्वामी विवेकानंदांच्या ‘उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका’, अशा विविध फलकांद्वारे मुंबईकरांचे प्रबोधन करण्यात आले. गिरगावच्या शोभायात्रेतील चैत्र नवरात्रीनिमित्ताने बसवलेली देवीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेणारी ठरली. गिरगावमदील महिलांची ‘बुलेट रॅली’ वैशिष्ट्यपूर्ण असते. या वर्षीही येथे तोच उत्साह कायम होता.

गिरगाव भव्य शोभायात्रा
दादर भव्य शोभायात्रा

२. नवी मुंबई

सीबीडी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

वाशी येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आणि त्यांच्यावरील विविध ग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली. सानपाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य ‘होर्डिंग’ आकर्षणाचे केंद्र ठरले.

३. ठाणे

ठाणे भव्य शोभायात्रा

येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपिनेश्‍वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवाचा पुतळा असलेल्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. येथील शोभायात्रेत लहानग्यांनी केलेली मल्लखांब आणि हवेत कापडाच्या साहाय्याने केलेली योगासनांची प्रात्यक्षिके वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

४. डोंबिवली

डोंबिवली भव्य शोभायात्रा

नववर्ष शोभायांत्रांची जननी असलेल्या डोंबिवलीत कोरोना महामारीची २ वर्षे वगळता गेल्या २५ वर्षांपासून नववर्ष शोभायांत्रांचे आयोजन केले जाते. या वर्षीही येथील उत्साह कायम होता.

५. नाशिक

येथील शोभायात्रेत वृद्ध महिलांपासून लहान मुलींचा सहभाग असलेल्या लेझिम पथकांचे सर्वत्र कौतुक झाले. येथे शास्त्रीय नृत्यांगनांच्या पथकाने केलेल्या नृत्याने सर्वांचे लक्ष आकर्षून घेतले.

६. नागपूर

येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि गुढीपूजन केले. ५१ फुटी उंच गुढी हे येथील शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते.

७. नगर

येथेही ‘चैत्र शोभायात्रा’ या नावाने शोभायात्रा काढण्यात आली.

८. बावधन (पुणे)

येथेही मोठ्या उत्साहात शोभायात्रा निघाली.