श्री सरस्वतीदेवीची विटंबना थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सातारा, २१ मार्च (वार्ता.) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने वर्ष २०१२ – १३ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ६-७ फूट उंचीची श्री सरस्वतीदेवीची मूर्ती भेट दिली होती; मात्र ज्या भावाने शिक्षकाने ही मूर्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला भेट दिली, त्या भावाने शिक्षण विभागाच्या वतीने त्याचे पावित्र्य राखले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. शिक्षण विभागाने ही मूर्ती दुसर्‍या मजल्यावरील मोकळ्या जागेत दर्शनी भागात ठेवली; मात्र गत अनेक वर्षांपासून ही मूर्ती धुळखात पडून आहे. अडगळीत धुळखात पडलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करून देवीची अशी विटंबना करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुरेश पंडित, शंकर पवार, चंद्रकांत महाडिक आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, हिंदु पुराणानुसार श्री सरस्वतीदेवी ही विद्येची देवता मानली जाते. शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणताही कार्यक्रम असला की, प्रथमत: श्री सरस्वतीदेवीचे पूजन केले जाते; मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या यामुळे शिक्षण विभागालाच विद्येच्या देवतेचा विसर पडला आहे. मोकळ्या जागेत अडगळीचे साहित्यही रचण्यात आले आहे, तिथेच श्री सरस्वतीदेवीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवसभरात अनेक अधिकारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात; मात्र त्यांना याविषयी काहीच वाटत नाही. विद्येच्या प्रांगणातच शिक्षण विभागाकडून असा प्रकार होत असेल, तर यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते ?