मुंबई, २० मार्च (वार्ता.) – मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मे २०२३ पर्यंत महामार्गाची एक लेन पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल. नियमित किती काम होत आहे ? याची ड्रोनद्वारे पहाणी केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी २० मार्च या दिवशी सभागृहात दिली. सभागृहात मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी सभासदांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर मंत्री चव्हाण यांनी वरील माहिती दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘‘पनवेल ते इंदापूर या मार्गासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र अंतर्गत वादामुळे १ सहस्र ५५६ प्रकरणे प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे हे वाद मिटवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी साहाय्य करावे. पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर असे कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. २३ मार्चपासून रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. ठेकेदारांनीच ‘ड्रोन’द्वारे कामाची पहाणी करून ‘नियमित किती काम झाले’, याची माहिती संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी साहाय्य करावे.’’