सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधना पूर्ण करून समष्टी सेवा केल्यावर मनातील भीती जाऊन मनमोकळेपणाने बोलता येणे

फाल्गुन कृष्ण द्वादशी (१९.३.२०२३) या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त एका साधकाला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यावर स्वत:मध्ये जाणवलेला पालट अन् शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१. बर्‍याच मासांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास होणे अन् व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा समष्टी सेवेवरही परिणाम होणे

श्री. वीरेश अहीर

‘मला बर्‍याच मासांपासून ‘छातीत धडधडणे, रक्तदाब वाढणे, कंबरदुखी आणि पाठदुखी यांचा त्रास वाढणे, रात्री अकस्मात् जाग येणे आणि भीती वाटणे’, असे त्रास होत होते. त्यामुळे ‘चिडचिडेपणा वाढणे, मनातील विचार व्यक्त न करणे, निरर्थक विचार करणे’, असे मानसिक त्रासही चालू झाले होते. माझे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष झाले आणि समष्टी सेवेवरही परिणाम झाला होता. मी माझ्या या स्थितीविषयी माझी पत्नी किंवा इतर कोणत्याही साधकाशी बोलत नव्हतो.

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्संग लाभल्यावर २ – ३ दिवस कोणताही त्रास न होणे

श्री गुरुमाऊलींच्या कृपेने मार्च २०२२ मध्ये मला ठाणे सेवाकेंद्रात असलेल्या साधना शिबिरात सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्संग लाभला. त्यानंतर पुढील २ – ३ दिवस मला कोणताच त्रास झाला नाही.

३. साधकाने आरंभी सद्गुरु अनुताईंना नामजपादी उपायांविषयी विचारण्याचे टाळणे; परंतु सहसाधकांनी त्यांना साधकाच्या त्रासाविषयी सांगितल्यावर सद्गुरु ताईंनी नामजपादी उपाय सांगणे

त्रास दूर झाल्याच्या माझ्या अनुभूतीविषयी मी माझ्या पत्नीला सांगितले. तेव्हा तिने मला सुचवले, ‘‘‘हे सर्व सद्गुरु अनुताईंना सांगा. त्या काही उपाय सांगतील.’’ त्यानंतर २ वेळा मी ठाणे सेवाकेंद्रात गेलो; पण सद्गुरु ताईंना याविषयी काही बोललो नाही. प्रत्येक वेळी ‘नंतर बोलू. आता त्या व्यस्त असतील’, असा चुकीचा विचार करून मी स्वतःलाच फसवून घरी यायचो; पण एकदा एका सत्संगानंतर सहसाधकांनी माझ्या स्थितीविषयी सद्गुरु ताईंना सांगितले. त्यानंतर त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितले.

४. सद्गुरु अनुताईंनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधना पूर्ण करून समष्टी सेवा केल्यावर सकारात्मकता वाढणे आणि सेवा चांगली होऊ लागणे

त्यानंतर सद्गुरु अनुताई मला म्हणाल्या, ‘‘व्यष्टी साधना पूर्ण करा आणि नंतर समष्टी सेवेसाठी प्रतिदिन बाहेर पडा.’’ मी दुसर्‍या दिवसापासून व्यष्टी साधना पूर्ण करून समष्टी सेवेला जायला लागलो. तेव्हापासून माझ्या मनात भीतीचे विचार येत नाहीत. मी मनमोकळेपणाने बोलायला लागलो. त्यामुळे आमच्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. मी प्रत्येक प्रसंगात सकारात्मक विचार करायला लागलो. माझी सेवाही चांगली व्हायला लागली आहे.

५. ‘संतांचे मार्गदर्शन घेऊन व्यष्टी साधना केल्याने मनाची खंबीरता वाढते आणि समष्टी सेवा केल्याने प्रारब्धभोग सहजतेने भोगता येतात’, हे या प्रसंगातून शिकायला मिळणे

या प्रसंगांमधून मला शिकायला मिळाले, ‘व्यष्टी साधना अल्प व्हायला लागली, तर मनावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते. व्यष्टी साधना केल्याने मनाची खंबीरता वाढते आणि समष्टी सेवा केल्याने अनेक प्रारब्धभोग सहजतेने भोगता येतात. यातून शारीरिक त्रासांची तीव्रता न्यून होते. संतांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यावर साधनेतील अडथळे त्वरित दूर होतात.’

सद्गुरु अनुराधाताई आणि श्रीमन्नारायणस्वरूप श्री गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. वीरेश अहीर (वय ४६ वर्षे), अंबरनाथ, ठाणे. (२१.६.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.