उच्चपदस्थ अधिकार्यांच्या समितीकडून चौकशी होणार
मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. ‘ऑनलाईन’ पेपर पडताळणी, तसेच राज्य क्रीडा स्पर्धेत हा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सातपुते यांनी केला. या आरोपानंतर उच्चपदस्थ अधिकार्यांच्या माध्यमातून कुलगुरूंची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
१. कोरोना महामारीच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठात ‘ऑनलाईन’ परीक्षा पद्धती अवलंबण्यात आली होती. या परीक्षेत उत्तरपत्रिका पडताळण्यासाठीचे कंत्राट एका आस्थापनाला देण्यात आले होते. राज्यातील अनेक विद्यापिठांत प्रतिपेपर पडताळणीचा दर ८ ते १२ रुपये असा निश्चित करण्यात आला होता; मात्र विद्यापिठाने ३५ रुपये प्रमाणे हे कंत्राट संमत केले, तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही भ्रष्टाचार झाला आहे. विद्यापिठाच्या ‘कॅन्टीन’च्या कंत्राटामध्येही भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात केला. या वेळी विद्यापिठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस अधिकारांचा गैरवापर करत असल्याची टीकाही आमदार सातपुते यांनी या वेळी केली.
२. आमदार सातपुते यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर विद्यापिठाने खुलासा केला आहे; मात्र या खुलाशानंतरही सदस्यांचे समाधान न झाल्याने राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्या माध्यमातून कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांची चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री चंद्रकात पाटील यांनी सभागृहात दिली.
३. कुलगुरु फडणवीस या ५ मे या दिवशी सेवानिवृत्त होणार आहेत. त्या आधी ३० एप्रिलपर्यंत या समितीचा अहवाल येईल. ‘अहवाल नकारात्मक आल्यास सेवानिवृत्तीनंतरचे लाभ दिले जाणार नाहीत’, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी सभागृहात केली.
कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवावे ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी
सोलापूर – कुलगुरु मृणालिनी फडणवीस या विद्यापिठाच्या कुलगुरु पदावर असल्यास चौकशी निष्पक्ष होणार नाही. त्यामुळे चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत कुलगुरु फडणवीस यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. २१ मार्च या दिवशी विद्यापिठामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण आहे. भ्रष्ट अधिकार्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास मंत्री पाटील यांनी उपस्थित राहू नये. अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रोषास सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. या वेळी विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी रोहित राऊत, व्यंकटेश कुलकर्णी, आदित्य मुस्के, सागर टक्कळगी आदी उपस्थित होते.