अवकाळी पावसासह गारपिटीने राज्यात पिकांची अतोनात हानी !
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – राज्यात ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. हवामान विभागाने राज्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे; मात्र राज्यातील सरकार शेतकर्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी हानीचे पंचनामे चालू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत केला, तसेच राज्याचे कृषीमंत्री शेतकर्यांच्या प्रश्नी काहीही विधाने करून अकलेचे तारे तोडत आहेत, असे सांगून त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला.
राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. पीकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्याला यलो ॲलर्ट दिला आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/7hILEtPhrm
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 17, 2023
अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी साहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात हानीचे पंचनामे अद्याप चालू झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे, हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असतांना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीची पुष्कळ हानी झालेली नाही’, अशी वक्तव्ये करून आकलेचे तारे तोडून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. अवकाळी पावसाने हानी झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने चालू करून शेतकर्यांना हानीभरपाई द्यावी.’’