(सायबर सुरक्षा – संगणक, माहिती आणि तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित माहितीची सुरक्षा)
मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – राज्यात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत १३ मार्च या दिवशी दिली. याविषयी सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढण्याविषयी, तसेच इतर विविध गुन्ह्यांविषयी सायबर कायदे जुने असून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये पालट करण्याची सूचना केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यात घडणार्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.