समृद्धी महामार्गावर ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळील अपघाताचे विधानसभेत पडसाद !

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – समृद्धी महामार्गावर १२ मार्च या दिवशी झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे १३ मार्च या दिवशी विधानसभेत पडसाद उमटले. आमदार संजय रायमूलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘अपघातप्रवण स्थळांवर उपायोजना करणार का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्यास उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘समृद्धी महामार्गावर लवकरच ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ (ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम) चालू करणार आहे’, अशी घोषणा केली. यासह ‘महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल. वाहनात अधिक प्रवासी असतील, तर अशा वाहनांना अडवले जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार संजय रायमूलकर म्हणाले की, समृद्धी महामार्गावरील शिवणी गावाजवळ असलेल्या पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहन जलद गतीने जात असतांना ते चालकाच्या लक्षात येत नाहीत. वाहन पुलावर गेले की, वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. अशी काही अपघातप्रवण अन्यही स्थळे आहेत, त्यांची पहाणी करून ते दुरुस्त करणार आहात का ? या अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित करणार का ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर निवेदन करतांना म्हणाले की, या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात सकाळी ८ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास झाला. वाहनातून जवळपास १३ व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनाची क्षमता ७ व्यक्तींची होती. अतीवेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे, ही अपघाताची सकृतदर्शनी कारणे दिसत आहेत. तरीही मृतांच्या नातेवाइकांना साहाय्य देण्याच्या अनुषंगाने सर्व गोष्टी पडताळून उचित कार्यवाही केली जाईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या महामार्गावर काही ठिकाणे ही अपघाताची ठिकाणे बनली आहेत. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे अल्प आहेत. काही जागांवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा जागांची माहिती गोळा केली आहे. सुधारणा चालू आहे. त्याच्यावर उपाय म्हणून ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ बसवत आहोत. त्यामुळे अतीवेग, अपघातग्रस्त जागा आदींविषयीची पूर्वसूचना मिळू शकेल.