निर्भीड आणि राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी अभिमान असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पिंपळे गुरव (पुणे) येथील कु. रेणुका संजय चव्हाण (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. रेणुका संजय चव्हाण ही या पिढीतील एक आहे !

फाल्गुन कृष्ण चतुर्थी (११.३.२०२३) या दिवशी कु. रेणुका संजय चव्हाण हिचा १२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. रेणुका चव्हाण
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


 पालकांनो, हे लक्षात घ्या !   

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. मिळूनमिसळून रहाणे

‘कु. रेणुकाचा स्वभाव बोलका आहे. ती सर्व वयोगटांतील व्यक्तींमध्ये सहज मिसळते. ती सर्वांना हवीहवीशी वाटते.

सौ. माधुरी चव्हाण

२. सात्त्विकतेची आवड

रेणुकाला पारंपरिक वेशभूषा करायला पुष्कळ आवडते. तिला नऊवारी किंवा सहावारी साडी नेसायला आवडते. तिला जीन्स घालायला मुळीच आवडत नाही.

३. निर्भीडपणा

वर्गात काही अयोग्य घडले, तर त्याविषयी सर्वप्रथम ती वर्गशिक्षिकेला सांगते. त्यांनी ऐकले नाही किंवा योग्य उपाययोजना मिळाली नाही, तर ती मुख्याध्यापकांना सांगते. ती कुणालाही सत्य सांगायला घाबरत नाही.

४. मर्दानी खेळ आणि युद्धकला शिकणे

रेणुकाने आता मर्दानी खेळ आणि युद्धकला यांची शिकवणी लावली आहे. ती आवडीने आणि उत्स्फूर्तपणे ते सर्व शिकते आणि सराव करते. तिला लाठीकाठी चालवता येते. ती म्हणते, ‘‘श्री गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने हे सर्व आपल्याला शिकता येत आहे. स्वतः ही कला शिकून इतरांनाही ती शिकवायची आहे. येणार्‍या काळात आपल्याला याचा उपयोग होईल.’’

५. अन्यायाची चीड असणे

कुठे अन्याय दिसत असेल, तर लगेच तिचे रक्त सळसळते. ती म्हणते, ‘‘अन्याय सहन करणे’, हेही पापच आहे. त्याचा प्रतिकार करायला हवा.’’

६. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचा अभिमान

६ अ. राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करणे : रेणुकामध्ये लहानपणापासूनच लढाऊ वृत्ती आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातील अनेक प्रसंग तिच्या लक्षात आहेत. तिला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाबाई, पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी पुष्कळ आदर आणि अभिमान वाटतो. त्यांच्या जीवनचरित्रांचा तिने अभ्यास केला आहे. शाळेत आणि इतर ठिकाणी काही कार्यक्रम असतांना ती उत्स्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गाणे म्हणते. त्यामुळे तेथील वातावरण पालटून जाते.

६ आ. क्रांतीकारक, देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्याविषयी मनात अभिमान असणे

१. एकदा शाळेत वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘माझी शाळा – माझा अभिमान’ आणि ‘माझा आवडता क्रांतीकारक’, हे २ विषय दिले होते. शाळेतील बहुतेक सर्व मुलांनी ‘माझी शाळा – माझा अभिमान’, हा विषय घेतला होता. ते पाहून रेणुका मुख्याध्यापकांना म्हणाली, ‘‘बघा, आताची मुले कशी आहेत ? त्यांना क्रांतीकारकांविषयी काही वाटत नाही. सर्व मुलांनी ‘माझी शाळा’ हा विषय घेतला आहे.’’ तेव्हा मुख्याध्यापक काही वेळ शांत राहिले आणि म्हणाले, ‘‘हो. क्रांतीकारकांचा विषय घ्यायला हवा होता.’’

२. तिला देवता, राष्ट्र्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे विडंबन केलेले मुळीच आवडत नाही. एकदा शाळेमध्ये परीक्षेत श्री गणेशाचे खेळ खेळतांनाचे कार्टून-चित्र काढायला सांगितले होते. तिने ते काढले नाही. ती म्हणाली, ‘‘मला गुण मिळाले नाहीत, तरी चालतील; पण मी देवतेचे विडंबन करणार नाही.’’

३. या वर्षी परीक्षेतील एका प्रश्नात ‘प्रजेचा कल्याणकारी राजा’ म्हणून मोगल सम्राट अकबर याचे नाव लिहायचे होते. ती शिक्षिकेला म्हणाली, ‘‘हे उत्तर चुकीचे आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘पुस्तकात असेच आहे; म्हणून तसे लिही.’’ तेव्हा ती त्यांना म्हणाली, ‘‘मला गुण मिळाले नाहीत, तरी चालेल; पण मी हे उत्तर लिहिणार नाही.’’

७. सेवेची आवड

रेणुकाला माझ्या समवेत सेवेला यायला आवडते. ती मला सेवेसाठी साहाय्य करते आणि सेवेशी संबंधित गोष्टींची मला वेळोवेळी आठवण करून देते. तिला इतर साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करायला आवडते.

८. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

अ. ‘दागिने आणि कपडे विकत घेतांना त्यांवरील नक्षी सात्त्विक आहे कि असात्त्विक आहे ?’, हे तिला समजते. ती सर्व सात्त्विक वस्तूच निवडते.

आ. एखाद्या घरात जाण्यापूर्वीच तिला तिथे अनिष्ट शक्तींचा त्रास असल्यास ते लक्षात येते.

इ. कुणावर त्रासदायक शक्तीचे आवरण असेल, तर ते तिला लगेच समजते.

९. स्वभावदोष

अव्यवस्थितपणा’

– सौ. माधुरी संजय चव्हाण (कु. रेणुका हिची आई), पिंपळे गुरव, पुणे. (१२.९.२०२२)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘रेणुकामध्ये लढाऊ वृत्तीच्या समवेत भक्तीही असल्यामुळे तिचा रंग निळसर दिसतो’, असे सांगणे

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा कु. रेणुकाही तिथे उपस्थित होती. तिच्याकडे पहातांना मला तिच्या त्वचेवर निळसर छटा दिसत होती. हे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तिच्यात लढाऊ वृत्तीच्या समवेत भक्तीही आहे. त्यामुळे तिचा रंग निळसर दिसतो.’’

– श्री. आदित्य कासकर, फोंडा, गोवा.

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक