विशेषाधिकार भंगाच्या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी संजय राऊत यांना विधापरिषदेतही मुदतवाढ !

विधान परिषदेतून…

खासदार संजय राऊत

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – खासदार संजय राऊत यांना विधीमंडळाने दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटिशीवर स्पष्टीकरण देण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ९ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली. मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात येणार ? याविषयीचा कालावधी मात्र उपसभापतींनी घोषित केलेला नाही.

कोल्हापूर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ‘विधीमंडळ हे चोरमंडळ’ असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात २ मार्च या दिवशी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला होता. यावरून विधीमंडळाकडून राऊत यांना नोटीस देऊन खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी विधीमंडळाला पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.