राज्यात केवळ ११ प्रयोगशाळा, अर्ध्याहून अधिक पदे रिक्त !

भेसळयुक्त दूध’ प्रश्नावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची दु:स्थिती विधानसभेत उघड !

संजय राठोड

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – राज्यात भेसळयुक्त दूध पडताळण्यासाठी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागासाठी ३५० पदे संमत आहेत; मात्र १८८ जागा रिक्त आहेत. भेसळयुक्त पदार्थांचे नमुने पडताळण्यासाठी राज्यात केवळ ११ प्रयोगशाळा आहेत, अशी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची दूरवस्था सांगणारी माहिती या विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्याविषयी ९ मार्च या दिवशी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांनी वरील माहिती दिली.

सौजन्य टीव्ही नाइन मराठी 

१. भेसळयुक्त दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पडताळण्यासाठी पाठवल्यास अहवाल येण्यासाठी १ वर्ष लागत असल्याची तक्रार अतुल भातखळकर यांनी सभागृहात दिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रवींद्र वायकर यांनी भेसळयुक्त दुधाप्रकरणी वर्षभरात किती धाडी टाकण्यात आल्या आणि किती गुन्हे नोंदवण्यात आले ? याची माहिती सादर करण्याची मागणी केली.

२. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दूध भेसळीसाठी आजीवन कारावासाची शिक्षा करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार राम कदम यांनी दूध भेसळ करणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

यावर उत्तर देतांना मंत्री संजय राठोड म्हणाले, वर्ष २०२२-२३ मध्ये भेसळयुक्त दुधाचे १ सहस्र १८७ नमुने पडताळण्यात आले. त्यांतील ३५० नमुन्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. मुंबईत दुधाचे १०२ नमुने पडताळण्यात आले असून त्यांतील ४४ नमुन्यांचे अहवाल आलेले नाहीत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करेल. राज्यात दुधाळ जनावरे किती आहेत आणि प्रत्यक्ष किती दुधाची विक्री होते ? याची पडताळणी करण्यात येईल. फिरत्या प्रयोगशाळा चालू करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.’’