म्हादई अभयारण्यात आग जाणीवपूर्वक लावलेली असू शकते ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कठोर कारवाईचे संकेत

म्हादई वन्यजीव अभयारण्यात लागलेली भीषण आग

पणजी, ८ मार्च (वार्ता.) – म्हादई अभयारण्यात लागलेली आग जाणीवपूर्वक लावलेली असू शकते. असे असेल, तर हे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलतांना डावीकडे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि वनमंत्री विश्वजित राणे

ते म्हणाले,

‘‘आगीच्या घटनेविषयी कळवताच ती विझवण्याचे दायित्व जे टाळत असतील, त्या अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येईल. आग लागलेल्या ठिकाणी सरकारी अधिकारी स्थानिक लोकांच्या साहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’’

आगीच्या घटनांवर उपाययोजना काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे अधिकारी, वनमंत्री विश्वजित राणे, पर्ये येथील आमदार देविया राणे, ज्येष्ठ सरकारी अधिकारी आणि वनखाते, पोलीस, अग्नीशमन दल यांतील अधिकारी यांची एक बैठक घेतली. हेलिकॉप्टर्सचे साहाय्य मिळवण्याविषयी एफ्.ओ.जी.ए.(फ्लॅग ऑफिसर नेव्हल एव्हिएशन) शी बोलणे झाले आहे. जिथे आगीचे बंब पोचू शकत नाहीत, तिथे ३० ते ३५ जणांचे पथक तेथील परिस्थिती हाताळत आहे. वेगवेगळी पथके अहोरात्र आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहेत. या आगीच्या घटनांसंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जे याला उत्तरदायी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’

मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांना जंगलाच्या जवळ असलेल्या काजूच्या बागांमध्ये आग पसरू नये, यासाठी बागेतील सुके गवत जाळून परिसर स्वच्छ करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

म्हादई अभयारण्यात प्रवेशास बंदी घालावी ! – वनमंत्री राणे

म्हादई अभयारण्यात घडलेल्या आगीच्या घटनांनंतर अभयारण्यात प्रवेश करण्यावर बंदी घालावी, असे वक्तव्य वनमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘मी मुख्य वनसंरक्षकांना ‘आग नियंत्रणात आणण्यासाठी वन रक्षकांना सर्व ठिकाणी नियुक्त करण्यात यावे’, असा आदेश दिला आहे. उप वनसंरक्षकांनाही चौकशी करण्याचे आदेश दिले असून कामात कुचराई करणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी इतर खात्यांतील सर्वांना साहाय्य करण्याचे आदेश दिले आहेत. जंगलाची हानी न होता ही आग त्वरित थांबावी, यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न करत आहोत.’’

क्षेत्रीय वन अधिकारी आणि वनरक्षक यांना २४ घंटे जागरूक रहाण्याचे आदेश

क्षेत्रीय वन अधिकारी आणि वनरक्षक यांना जंगलात २४ घंटे जागरूक रहाण्याविषयीचे आदेश दिले असून अभयारण्याच्या परिसरात काही घडले, तर तुम्ही उत्तरदायी रहाल आणि त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे मी वनखात्याच्या उप वनसंरक्षकांना सांगितले असल्याचे वनमंत्र्यांनी म्हटले.