पुणे येथील ठेकेदारांचा संप : नागरिकांना मनस्‍ताप !

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला) बससेवा पुरवणार्‍या ४ ठेकेदारांनी गेल्‍या अनेक मासांपासूनची थकबाकी न मिळाल्‍याने ५ मार्चला अचानक संप पुकारला होता. यामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले होते. सामान्‍य नागरिकांना सणाच्‍या दिवशी बससेवा बंद असल्‍याने नाहक मनस्‍ताप सहन करावा लागला होता.

ऑलेक्‍ट्रा, ट्रॅव्‍हल टाईम, अँथनी आणि हंसा या ४ ठेकेदार आस्‍थापनांचे ९९ कोटी रुपयांचे देयक थकल्‍यामुळे त्‍यांनी संपाची हाक दिली होती. यानंतर ६ मार्चला रात्री बससेवा पुरवणार्‍या या ४ ठेकेदारांना ६६ कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्‍यानंतर बससेवा पुन्‍हा एकदा चालू झाली आहे. अशी माहिती पी.एम्.पी.एम्.एल्.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली. (संप केल्‍यानंतरच थकबाकी कशी काय दिली जाते ? हीच कृती आधी केली असती, तर जनतेला नाहक त्रास सोसावा लागला नसता ! – संपादक)