‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, या संदर्भात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) यांना येत असलेली प्रचीती !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून ‘स्‍थुलात न अडकता सूक्ष्माकडे जायचे’, असे सांगणे

‘माझी आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाल्‍याचे घोषित होऊन एक वर्ष झाले. त्‍या वेळी मी घरी होते. त्‍या दिवशी मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, या १ वर्षात तुम्‍हाला अपेक्षित असे प्रयत्न करायला मी पुष्‍कळ अल्‍प पडले. आता ‘यापुढे मी कसे प्रयत्न करू ?’, हे तुम्‍हीच मला सांगा.’ त्‍या दिवशी मला सूक्ष्मातून गुरुदेवांचा आवाज ऐकू आला, ‘आता स्‍थुलात अडकायचे नाही, सूक्ष्मात जायचे आहे.’ त्‍या वेळी ‘गुरुदेव मला असे का सांगत आहेत ?’, हे मला समजले नाही. त्‍यानंतर सलग ४ – ५ दिवस परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला असे सांगत असल्‍याचा आवाज येत होता. ‘ते मला असे का सांगत आहेत ?’, हे त्‍या वेळी मला समजले नव्‍हते.

कु. अपाला औंधकर

२. ‘सूक्ष्माकडे जायचे आहे’, या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या उद़्‍गारांची साधिकेला आठवण होणे

मी घरून आश्रमात आल्‍यावर मला समजले, ‘आता एका संतांच्‍या सत्‍संगात दैवी बालक बसत नाहीत.’ त्‍या वेळी एक क्षण मला फार वाईट वाटले. मला वाटले, ‘आता मला देवाचे दर्शन कसे होणार ? मी देवाशी कधी बोलणार ?’ त्‍याच क्षणी मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सूक्ष्मातून सांगितलेल्‍या उद़्‍गारांची आठवण आली. त्‍यांनी मला आधीच सूक्ष्मातून सांगितले होते, ‘आता स्‍थुलात न अडकता सूक्ष्मात जायचे आहे.’ ‘मला त्‍यांचा सत्‍संग २ – ३ घंटेच लाभत असे; परंतु सूक्ष्मातून तर ते माझ्‍या समवेत २४ घंटे आहेत’, याची मला जाणीव झाली.

३. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण झाल्‍यावर ‘पूर्वी शिकवलेले कृतीत आण’, असे ते सांगत आहेत’, असे जाणवणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या ‘आता स्‍थुलात अडकायचे नाही, सूक्ष्मात जायचे आहे’, या उद़्‍गारांची मला प्रतिदिन आठवण होते. मला त्‍यांची पुष्‍कळ आठवण आली की, मी पूर्वी त्‍यांच्‍याशी साधलेल्‍या संवादाविषयीचे लिखाण वाचते. त्‍या वेळी ते मला सूक्ष्मातून पुन्‍हा सांगतात, ‘हे शिक आणि कृतीत आण हो अन् अधिकाधिक समष्‍टी साधनेकडे लक्ष दे.’ तेव्‍हा ‘ते माझ्‍याशी प्रत्‍यक्ष बोलत आहेत’, असे मला जाणवते.

४. उत्तरदायी साधिकेच्‍या माध्‍यमातून ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवच बोलत आहेत’, असे जाणवणे

एकदा मी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के)  यांच्‍याशी एका सेवेविषयी बोलत होते. त्‍या वेळी माझ्‍याकडून समष्‍टीचा विचार अल्‍प पडला. तेव्‍हा तेजलताई मला म्‍हणाली, ‘‘यात तुला स्‍वतःलाच आनंद मिळाला. समष्‍टीला आनंद मिळावा, यासाठीही प्रयत्न कर. तू केलेल्‍या नृत्‍यातून केवळ तुलाच देवाला अनुभवता येईल; परंतु आपण त्‍याचे चित्रीकरण करून ठेवले, तर ते चित्रीकरण पहाणार्‍या १०० जणांना देव अनुभवता येईल’, असा विचार कर.’’ ताई मला हे सांगत असतांना मला तिचा आवाज ऐकू येत नव्‍हता. त्‍या वेळी ‘साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवच माझ्‍याशी बोलत आहेत’, असे मला वाटले आणि माझा भाव जागृत झाला. तेव्‍हा पुन्‍हा गुरुदेव मला सूक्ष्मातून म्‍हणाले, ‘तेजलच्‍या माध्‍यमातून मीच तुझ्‍याशी बोलत होतो. तू मला ओळखलेस ना ?’ त्‍या वेळी मला जाणीव झाली, ‘आता गुरुदेव मला सूक्ष्मातून प्रत्‍येक प्रसंगात भेटणार आहेत. मी केवळ त्‍यांना ओळखायला हवे आणि त्‍यांना अपेक्षित असे प्रयत्न करायला हवेत.’

५. सर्वांतर्यामी परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

५ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना केलेले आत्‍मनिवेदन त्‍यांच्‍यापर्यंत पोचले असल्‍याची आलेली प्रचीती !

एकदा एका प्रसंगामुळे माझ्‍या मनात पुष्‍कळ नकारात्‍मक विचार येत होते. तेव्‍हा मी परात्‍पर गुरुदेवांच्‍या खोलीसमोरील आगाशीत बसले होते. माझे त्‍यांच्‍या खोलीकडे लक्षही गेले नाही. मी त्‍यांना आत्‍मनिवेदन करत होते, ‘गुरुदेव, माझ्‍या संदर्भात घडलेला हा प्रसंग तुम्‍हाला ठाऊक आहे ना ? तो प्रसंग तुमच्‍यापर्यंत पोचला ना ?’ मी असे म्‍हणत असतांना अकस्‍मात् डोक्‍याला हात लावला.

प.पू. गुरुदेवांनी हे सर्व त्‍यांच्‍या खोलीतून स्‍थुलातून पाहिले आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या खोलीतील एका साधकाला विचारले, ‘‘अपाला डोके का खाजवत आहे ?’’ त्‍या साधकाने मला याविषयी सांगितले. गुरुदेवांचा हा निरोप ऐकताच मला प्रसंगामुळे आलेला ताण पूर्णपणे नष्‍ट झाला आणि मी त्‍या प्रसंगातून बाहेर पडले. खरेच, गुरुदेव किती भक्‍तवत्‍सल आहेत ! त्‍यांनी मला खिडकीतून पाहून माझ्‍या मनाची स्‍थिती जाणली आणि मला निरोप पाठवला.

त्‍या वेळी मला पुन्‍हा जाणीव झाली, ‘आपण गुरुदेवांना सूक्ष्मातून आत्‍मनिवेदन केले, तरीही ते त्‍यांच्‍यापर्यंत पोचते. माझी श्रद्धा अल्‍प पडल्‍याने माझ्‍या मनात ‘मी केलेले आत्‍मनिवेदन त्‍यांच्‍यापर्यंत पोचते ना ?’, असा विचार आला.’ तेव्‍हा ‘गुरुदेवांनी माझे आत्‍मनिवेदन सूक्ष्मातून ऐकून मला स्‍थुलातून निरोप पाठवला’, हे मला पुष्‍कळ आगळेवेगळे आणि वैशिष्‍ट्यपूर्ण वाटले. ‘आपल्‍या गुरुदेवांना सर्वांचे सर्वकाही कळते. ते प्रत्‍येकाची प्रत्‍येक अडचण जाणतात. असे एकमेव आमचे गुरुदेव आहेत’, याची मला जाणीव होऊन माझी मनोमन अपार कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

गुरुदेव, ‘तुम्‍ही माझ्‍या समवेत प्रत्‍येक क्षणी सूक्ष्मातून आहात’, असा भाव ठेवायला तुम्‍ही मला शिकवत आहात. ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ का आहे ?’, हे तुम्‍हीच मला शिकवत आहात’, असे वाटून माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– केवळ गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (१८.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक