(म्हणे) ‘पाकमधील लाखो लोक भारतासमवेत चांगले संबंध चिंततात !’ – गीतकार जावेद अख्तर

भारतात परतल्यावर केले वक्तव्य !

गीतकार जावेद अख्तर

नवी देहली – पाकिस्तानमधील लाखो लोक भारताची प्रशंसा करतात. ते भारतासमवेत चांगले संबंध चिंततात. आम्ही अशा जगाचा विचार करतो, जिथे विभाजन होणार नाही, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. ते पाकच्या लाहोरच्या दौर्‍यावरून नुकतेच परतले. तेथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित ‘फैज फेस्टिवल’मध्ये त्यांनी ‘मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचे सूत्रधार आजही पाकिस्तानमध्ये मोकाट फिरत असून ते नॉर्वे अथवा इजिप्त येथून आलेले नाहीत’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानी जनतेसमवेत भारतातही कौतुक होत आहे.

भारतात परतलेले अख्तर वृत्तवाहिन्यांशी बोलतांना म्हणाले की,

१. पाकच्या लाखो लोकांना आपल्याशी जोडण्याची इच्छा आहे. ‘त्यांना कसे जोडता येईल’, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल.

२. ‘भारत आणि पाक यांच्यात बोलणी व्हावी का ?’, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचे माझ्यात सामर्थ्य नाही. सत्तेत असलेले हे अधिक चांगले जाणतात की, काय चालू आहे आणि पुढे काय केले पाहिजे ! पाकिस्तानी सैन्य, तेथील जनता आणि सरकार यांची विचारसरणी एकसारखी नाही. तरी जे लोक देश चालवत आहेत, तेच यासंदर्भात चांगले जाणतात. माझा याविषयीचा अभ्यास अल्प आहे.’’

संपादकीय भूमिका

पाकमधील राजकारणी, सैन्य, कलाकार, उद्योजक, तसेच सामान्य जनता भारताचा द्वेष करते. तेथील हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक भारताविषयी चांगले मत व्यक्त करत असतील. त्यामुळे असे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे !