कोल्हापूर – येथील कणेरी मठ येथे २० फेब्रुवारीला ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ अंतर्गत पंचतत्त्वांच्या संरक्षणाचा संदेश देणार्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी पंचतत्त्वांच्या संरक्षणाची शपथ घेतली. प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी सिद्ध केलेल्या या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. केवळ २० मिनिटांत ५० कलाकारांच्या सहभागातून हा प्रयोग सादर करण्यात आला आहे. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्त्व, त्यांच्यावर होत असलेले अपायकारक परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेले पालट यांचा संदेश या प्रयोगातून देण्यात आला.
‘स्क्रीन’, ‘लेझर शो’, नृत्य, नाट्य आणि ‘स्पेशल इफेक्ट’ (अग्नी, वारा, पाऊस) यांचा वापर करून सिद्ध करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच संदेशपर प्रयोग असल्याची माहिती निर्माते-दिग्दर्शक विजू माने यांनी दिली. या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांसह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.