१. पोलीस महासंचालकांच्या परिषदेत संभाव्य चिनी आक्रमणाची चेतावणी दिली जाणे
‘वर्ष २०२३ मध्ये चीन भारताच्या लडाखमध्ये अतिक्रमण करू शकतो आणि भारतीय अन् चिनी सैन्य यांची झडप होऊ शकते; म्हणून भारतीय सैन्याने सिद्ध रहायला पाहिजे’, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. पोलीस महासंचालकांची परिषद वर्षातून एकदाच होत असते. या परिषदेत पोलीस महासंचालक गृहमंत्रालयात गुप्तचर विभागाच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात आणि तेथे अंतर्गत सुरक्षेवर चर्चा करतात. खरेतर चीनने लडाखमध्ये येणे, हा या परिषदेतील चर्चेचा विषय होऊ शकत नाही. त्यापेक्षा नक्षलवाद, बांगलादेशी घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी, सामान्य माणसाची असुरक्षितता असे विषय चर्चिले जाऊ शकतात; परंतु तेथे एक प्रबंध ठेवण्यात आला असून त्यात चिनी आक्रमणाविषयी माहिती दिलेली आहे.
२. लडाखमधील बर्फ वितळेपर्यंत चीनकडून आक्रमण अशक्य !
चीनमध्ये आक्रमण करण्याची निश्चित क्षमता आहे. आज चीनचे त्या भागात ५० ते ६० सहस्र सैनिक तैनात आहेत. तसेच चीनने त्या भागात अनेक रस्तेही बनवलेले आहेत. जसे यांगत्सेमध्ये चीनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्याने चिनी सैन्याची पिटाई केली, तसेच येथेही घडू शकते. सध्या लडाखमध्ये बर्फ पडलेला आहे. मार्च आणि एप्रिल मासापर्यंत तेथे बर्फ असणारच आहे. त्या वेळी अशा प्रकारचे कुठलेही आक्रमण होऊ शकत नाही. त्यामुळे चीन आक्रमण करणार असल्याची मिळालेली चेतावणी चुकीची आहे. लडाखमध्ये बर्फ असतांना आक्रमण होऊ शकत नाही; मात्र ज्या ठिकाणी बर्फ अल्प असतो, त्या तवांग किंवा अरुणाचल प्रदेशच्या भागात आक्रमण होऊ शकते.
३. चिनी आक्रमण थांबवण्यात भारतीय सैन्य सक्षम
चीनच्या या आक्रमणाकडे लक्ष ठेवण्यासाठी भारताची टेहळणी यंत्रणा चांगली असावी लागते. त्यासाठी ड्रोनचा वापर केला पाहिजे, गस्तही घातली पाहिजे. यात आता वाढ झालेली आहे. या भागातील रस्तेही वाढले आहेत आणि पुढेही ते वाढणार आहेत. त्यामुळे चीनने आक्रमण केल्याचे लगेचच कळेल. तसेच झालेले आक्रमण थांबवण्याची भारताची क्षमताही पुष्कळ वाढली आहे. त्यामुळे चीनला म्हणावे तितके आक्रमण करणे सोपे नाही. तसे झालेच, तर भारतीय सैन्य चिनी सैन्याची पिटाई करण्यात सक्षम आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.