१. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ
‘डिसेंबर १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून राजगुरुनगर (पुणे) येथील ‘श्री लिखिते गणेश मंदिर’ येथे सनातन संस्थेने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर एका प्रवचनाचे आयोजन केले होते. त्या प्रवचनाला २५० ते ३०० व्यक्ती आल्या होत्या. त्या प्रवचनात ‘कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, देवघराची मांडणी अन् त्यामागील शास्त्र’, यांविषयी सर्व माहिती ऐकल्यावर ‘आपण हे सर्व करून बघूया’, असे मला वाटले आणि मी लगेचच कुलदेवीच्या अन् ‘श्री गुरुदेव दत्त ।’, या नामजपाला आरंभ केला. त्याच रात्री मी देवघरातील देवांची मांडणीही पालटली.
२. प्रवचनात सांगितल्याप्रमाणे कृती करणे आणि त्यानंतर आलेल्या अनुभूती
२ अ. शास्त्रानुसार देवघरातील देवांची मांडणी पालटल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळू लागणे : मला देवाची पूजा करण्याची पुष्कळ आवड असल्याने मी वेगवेगळ्या ठिकाणांहून देवतांची चित्रे आणि मूर्ती घेऊन येत असे. ‘देवघरातील देवांच्या मांडणीचे शास्त्र आणि त्याचा लाभ’ याविषयी कळल्यावर मी देवतांच्या मांडणीत पालट करून शेष राहिलेली सर्व चित्रे अन् मूर्ती भीमा नदीमध्ये विसर्जित केल्या. त्यामुळे मला कुठलाही त्रास झाला नाही. देवघरातील देवांची मांडणी पालटल्यामुळे ‘एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळू लागला’, हे आम्ही सर्व कुटुंबियांनी (मी, पत्नी सौ. प्रतिभा, मुलगा श्री. महेंद्र आणि मुलगी कु. मेधा यांनी) अनुभवले.
२ आ. वेतनाव्यतिरिक्त एकही रुपयाही अधिक न घेण्याचे ठरवणे : त्या प्रवचनामध्ये ‘व्यसन, भ्रष्टाचार इत्यादींमुळे आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची होणारी हानी’ हा विषयही सांगितला होता. त्याच दिवशी मी ‘वेतनाव्यतिरिक्त एकही रुपया अधिक घ्यायचा नाही’, असे ठरवले. मी त्या दिवसापासून प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्यास प्रारंभ केला.
२ इ. राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी धनाचा त्याग करणे अन् त्यामुळे घरातील आजारपणात व्यय होणार्या पैशांचे प्रमाण उणावणे : ‘आपल्याला धनाची पुष्कळ अपेक्षा आणि आसक्ती असते. ती न्यून व्हावी; म्हणून राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी आपल्याला झेपेल तेवढा धनाचा त्याग करू शकतो’, हे प्रवचनातून कळल्यावर मी पहिल्याच मासात वेतनाच्या ५ टक्के रक्कम अर्पण केली. प्रत्येक मासाला अर्पण केल्यावर आमच्या लक्षात आले, ‘घरातील आजारपणात जो पैसा व्यय होत होता, त्याचे प्रमाण उणावले आहे. पुढे ६ मासांमध्ये औषधोपचारावर पैसे व्यय होणे पूर्ण थांबले.’ मला त्याच काळात उच्च रक्तदाबाचा त्रास चालू झाला होता. त्यासाठी मी एका ‘होमिओपॅथी’ वैद्यांंकडे गलो. त्यांनी दिलेल्या गोळ्यांनी माझा उच्च रक्तदाबाचा त्रास दूर झाला.
३. फोंडा (गोवा) येथील आश्रमात गेल्यावर त्यागाचे महत्त्व लक्षात येणे आणि कुटुंबियांच्या सहमतीने पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणे
सत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती केल्यानंतर त्या प्रकारच्या अनुभूतीही आमच्या कुटुंबाने अनुभवल्या आहेत. साधनेला २ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी फोंडा (गोवा) येथील सनातनचा ‘सुखसागर’ हा आश्रम पहाण्यासाठी गेलो. तेथे गेल्यानंतर सत्संगामध्ये तन, मन, धन आणि आसक्ती या सर्वांच्या त्यागाचे महत्त्व लक्षात आले. तेव्हा ‘आपण नोकरीचाही त्याग करू शकतो’, असा विचार माझ्या मनामध्ये येऊ लागला. आश्रमात येऊन गेल्यानंतर प्रथम सर्व कुटुंबियांना एकत्र बोलावले आणि ‘मी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर चालेल ना ? काही अडचण येणार नाही ना ?’, असे सर्वांना विचारले. त्यानंतर त्यांच्या सहमतीने मी एक मासाच्या आत स्वेच्छानिवृत्ती घेतली.
४. नोकरी करत असतांनापेक्षा नोकरी सोडल्यानंतर अधिक आनंदात रहाता येत असल्याची अनुभूती येणे
पूर्णवेळ साधनेसाठी मी पुणे सेवाकेंद्रात रहायला आलो. त्या कालावधीत स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर एका मासातच निवृत्तीवेतन आणि सर्व रक्कम मिळाली. त्यानंतर निवृत्तीवेतनात सर्व कुटुंबाचा व्यय पूर्ण होऊन काही रक्कम शेष राहू लागली. नोकरी असतांना रहात होतो, त्याहूनही अधिक आनंदाने मला नोकरी सोडल्यानंतर रहाता आले.
५. कुटुंबियांसह आश्रमात राहून गुरूंच्या कार्यामध्ये झोकून देऊन सेवा करू लागणे
‘साधनेमध्ये जे जे कळले, ते ते लगेच आचरणात आणल्यास देव कशी काळजी घेतो ?’, हे मी गेल्या २५ वर्षांपासून अनुभवत आहे. आम्ही सर्व कुटुंबीय आश्रमामध्ये राहून गुरूंच्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यामध्ये झोकून देऊन सेवा करू लागलो. (सध्या मी जळगाव सेवाकेंद्रात रहातो आणि पत्नी सौ. प्रतिभा, मुलगा श्री. महेंद्र अन् सून सौ. मानसी, तसेच मुलगी कु. मेधा हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहातात.) गुरुदेव आमच्याकडून प्रयत्न करून घेत आहेत. त्यातून आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो.
६. साधनेमुळे आसक्ती न्यून झाल्याने मन आनंदी रहाणे आणि त्यामुळे प्रकृती चांगली रहाणे
आज माझे वय ६८ वर्षेे असून गुरूंच्या कृपेने मला औषधाची एकही गोळी घ्यावी लागत नाही. साधनेने आसक्ती न्यून झाल्यामुळे ‘ताणतणाव’ संपला आहे आणि मन एकदम आनंदी अन् उत्साही रहाते. त्यामुळे ‘देवाच्या कृपेने प्रकृती चांगली रहाते’, हे अनुभवायला मिळाले.
७. ‘गुरूंची कृपा साधनेवरच अवलंबून असते आणि ती पैशाने कधीच विकत घेता येत नाही’, हे प्रत्यक्ष अनुभवणे
आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी कुणीही सांगितलेले नाही. मी स्वेच्छेनेच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. पुढे मुलांनी ‘शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ सेवा करणार’, असे सांगितले. पत्नीनेही ‘पूर्णवेळ आश्रमात राहून सेवा करीन’, असे सांगितले. त्याप्रमाणे पत्नी आणि मुलेही आश्रमामध्ये राहून सेवा करत आहेत आणि आनंद मिळवत आहेत. आम्ही जे अनुभवत आहोत, ते कितीही पैसे दिले, तरी विकत मिळणार नाही. गुरूंची कृपा ही साधनेवरच अवलंबून असते. ती पैशाने कधीच विकत घेता येणार नाही. ‘पैशांपेक्षा साधना महत्त्वाची आहे’, हे मी या २५ वर्षांच्या कालावधीत अनुभवले. ‘पत्नी आणि मुलेही साधना करू लागली’, हीसुद्धा गुरुदेवांचीच कृपा !
‘देवाने मला आजपर्यंत साधनेत टिकवून ठेवले’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. यशवंत सहस्रबुद्धे (वय ६८ वर्षे), जळगाव सेवाकेंद्र (३.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |