पी.सी.एम्.सी. शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्‍यासाठी निविदा प्रसिद्ध !

पिंपरी (पुणे) – ‘पी.सी.एम्.सी. (पिंपरी चिंचवड म्‍युनिसिपल कॉरपोरेशन) स्‍कूल पॅटर्न’नुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्‍यासाठी शाळांची एकसमान रचना करण्‍यात येणार आहे. त्‍या कामांची निविदा स्‍थापत्‍य विभागाने प्रसिद्ध केली आहे. पालिकेतील शाळेत अनुमाने ५० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्‍या सर्व शाळांची रचना आणि रंगसंगती वेगवेगळी आहे. पी.सी.एम्.सी. स्‍कूल या पॅटर्न अंतर्गत ३८ शाळांची रचना एकसमान करण्‍यात येणार आहे. त्‍या सर्व शाळा इमारती एका रंगसंगतीमध्‍ये रंगवल्‍या जाणार आहे. प्रवेशद्वार, नामफलक, शाळांचे बोधचिन्‍ह, वर्ग खोल्‍या आणि स्‍वच्‍छतागृहांची दुरुस्‍ती करून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्‍यामुळे पालिकेच्‍या शाळांची वेगळी ओळख निर्माण होऊन नागरिकांना ती लगेच ओळखता येणार आहे. त्‍या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्‍यात आली आहे, असे पालिकेच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले.

अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप जांभळे यांनी सांगितले की, महापालिका शाळेतील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. शिष्‍यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्‍य मिळवलेल्‍या विद्यार्थ्‍यांना ‘भारत दर्शन’ घडवले जाणार आहे. अवकाश संशोधन केंद्र आणि बेंगळुरू, देशाची राजधानी देहली अशा ठिकाणी शैक्षणिक सहल काढली जाणार आहे. या उपक्रमात राष्‍ट्रीय आणि राज्‍य क्रीडा स्‍पर्धेत चमकलेल्‍या खेळाडूंचाही समावेश करण्‍याचा विचार आहे.