भूतानच्‍या संसदीय शिष्‍टमंडळाने घेतली राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट !

मुंबई – भूतानच्‍या राष्‍ट्रीय संसदेचे अध्‍यक्ष वांगचुक नामग्‍येल यांनी १० संसदीय सदस्‍यांसह ९ फेब्रुवारी या दिवशी राजभवन येथे राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. या वेळी भूतान आणि महाराष्‍ट्र यांतील पर्यटन सहकार्य वाढवण्‍याविषयी चर्चा झाली.

या वेळी भूतानच्‍या राष्‍ट्रीय संसदेचे अध्‍यक्ष वांगचुक नामग्‍येल यांनी, ‘भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्‍या सामाजिक, आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपिठांवर भूतान भारताच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील सांस्‍कृतिक स्‍थळे भूतानच्‍या जनतेकरता आदराची आहेत. भूतान नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. या पार्श्‍वभूमीवर भूतान आणि महाराष्‍ट्र यांच्‍यात पर्यटन सहकार्य वाढावे’, अशी अपेक्षा या वेळी व्‍यक्‍त केली.

या वेळी भगत सिंह कोश्‍यारी यांनी, ‘भूतान आणि भारत सांस्‍कृतिकदृष्‍ट्या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. भूतानमध्‍ये बौद्ध धर्माचा प्रसार झाल्‍याचा अभिमान वाटतो. भूतान आणि भारत यांमध्‍ये व्‍यापार, वाणीज्‍य, लॉजिस्‍टिकस यांसह पर्यटन, शैक्षणिक सहकार्य वृद्धींगत व्‍हावे’, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.