अजित डोवाल आणि पुतिन यांची भेट

सामरिक भागीदारी आणि द्विपक्षीय संबंध यांवर चर्चा

अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट

मॉस्को (रशिया) – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतल्याची माहिती येथील भारतीय दूतावासाने दिली. या दोघांमध्ये सामरिक भागीदारी आणि द्विपक्षीय संबंध यांवर चर्चा झाली. डोवाल अफगाणिस्तानवरील सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या पाचव्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्को दौर्‍यावर गेले आहेत.


या बैठकीत डोवाल म्हणाले की, अफगाणिस्तान सध्या कठीण स्थितीतून मार्गक्रमण करत आहे. भारत या या संकटाच्या काळात अफगाणच्या जनतेला वार्‍यावर सोडणार नाही. भारताने अफगाणिस्तानला ४० सहस्र मेट्रीक टन गहू, ६० टन औषधे, ५ लाख कोविड प्रतिबंधात्मक लस पाठवून संकटकाळात साहाय्य केले आहे. आतंकवाद सर्वांत मोठा धोका बनला आहे. कोणत्याही देशाने अफगाणिस्तानच्या मार्गे आतंकवाद पसरू नये, असे आम्हाला वाटते. अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद सारख्या आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे.