आदिवासींना ‘हिंदु’ म्हटल्याने दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना धमक्या !

वडाळा पोलीस ठाण्यात ४ जणांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

योगिता साळवी

मुंबई – येथील दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना २८ जानेवारीपासून अज्ञात दूरभाष क्रमांकांवरून, तसेच व्हॉटस्अ‍ॅप संदेशांवरूनही धमक्या देण्यात येत आहेत. साळवी यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी वडाळा पोलीस ठाण्यात धमक्या देणार्‍यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. या दैनिकातील ‘रग रग हिंदु मेरा परिचय’ या लेखात ‘वारली व्यक्तीला हिंदु का म्हटले ?, आदिवासींना ‘वनवासी’ का म्हटले ?’ अशी धमकी दिली जात होती, तसेच ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेशात हिंदु धर्माविषयी अतिशय हिणकस शब्दांत लिहिलेले लेख पाठवले गेले आहेत. (हिंदुद्रोह्यांच्या धमक्यांना भीक न घालता त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार्‍या योगिता साळवी यांचे अभिनंदन ! – संपादक)

१. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’मध्ये ‘माणसं’ नावाचे लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये १७ जानेवारी या दिवशी वारली समाजबांधव नरेश मराड यांच्यावर साळवी यांनी ‘रग रग हिंदु मेरा परिचय’ हा लेख लिहिला होता.

२. या लेखाखाली योगिता यांचा भ्रमणभाष क्रमांक देण्यात आला आहे. काही अज्ञातांनी हा भ्रमणभाष क्रमांक अनेकांना पाठवला. त्यानंतर साळवी यांना अज्ञातांकडून धमक्या देण्यात येत आहेत.

३. एकाने ‘हिंदु’ म्हणजे ‘गालीगलोच’ (शिवीगाळ) असा अर्थ असून शंकर आणि लिंग याविषयीचे काही आपत्तीजनक शब्द असलेला लेख पाठवला आहे, तर विविध संघटनांचा दाखला देत २ व्हॉटस्अ‍ॅप संदेशात लिहिले आहे की, आदिवासींना वनवासी आणि ‘हिंदु’ म्हटले; म्हणून तुम्ही तात्काळ आमच्या समाजाची क्षमा मागा, अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तुमच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल.

४. सतत येणारे धमकीवजा संदेश आणि हिंदु समाज विरोधातील लेख वाचून साळवी यांनी त्यांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता मदन गुप्ता यांच्या वतीने दूरभाष करणारे आणि संदेश पाठवणारे असे एकूण ४ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • विचारांचा प्रतिवाद विचाराने न करता उपसंपादिका योगिता साळवी यांना धमक्या देणारे समाजघातकी आहेत. या लेखात आक्षेपार्ह काही नसतांना हिंदुद्वेषाची कावीळ झालेले धर्मद्रोही विनाकारण साळवी यांना धमक्या देत आहेत. अशा हिंदुद्रोह्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी इतर हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना साहाय्य करणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे !
  • आदिवासी हे मूळ हिंदूच आहेत. इंग्रजांच्या काळात हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी ‘आदिवासी’ असा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. हे सत्य समाजविघातक शक्ती जाणतील तो सुदिन !