डाकू घरात शिरल्यावर त्याला ठार मारण्यास तुम्ही सक्षम नसाल, तर मला बोलवा !

उत्तरप्रदेशमधील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांचे लोकांना आवाहन

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – एखादा डाकू घरात शिरला, तर घाबरू नका. तुम्ही त्याला ठार मारण्यास सक्षम नसाल, तर मला बोलवा, मी स्वतः त्याला ठार मारीन, असे विधान येथील लोणी मतदारसंघातील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी लोकांना आवाहन करतांना केले.

येथील नागरिकांनी सांगितले, ‘येथील टोळी विद्युत् अधिकारी असल्याचे सांगून वीज मीटर तपासण्यासाठी येऊन पैसे मागत होती, तसेच पैसे न दिल्यास वीज पुरवठा खंडीत करून खटला प्रविष्ट करण्याची धमकीही देत होती.’ स्थानिकांनी ही माहिती दिल्यानंतर आमदार नंदकिशोर गुर्जर घटनास्थळी पोचले. तोपर्यंत ही टोळी पसार झाली होती. गुर्जर यांनी या संदर्भात विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या अधिकार्‍यांनी विद्युत विभागाचे एकही पथक या भागात आले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर आमदार गुर्जर यांनी लोकांना सांगितले की, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना बांधून टाकावे. ते बोगस विद्युत् कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना घटनास्थळीच ठार मारावे. नंतर जे काही होईल, ते मी पाहून घेईल. गुन्हा नोंद झाला, तर तोसुद्धा मी माझ्यावर घेईन.

काही मासांपूर्वी गुर्जर यांना मिळाली होती ठार मारण्याची धमकी

ऑगस्ट मासामध्येच आमदार नंदकिशोर गुर्जर यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकीचे पत्र त्यांच्या कार्यालयात ‘स्पीड पोस्ट’ने पाठवण्यात आले होते. पाकिटावर ‘साजिद अल्वी’ असे नाव होते. यात लिहिले होते, ‘‘तुला फार दिवसांपासून पहात आहे, तर कधी चिकन, कधी मटण, तर कधी मुसलमानांची उपाहारगृहे बंद करत आहेस. आता तुझी उलटगणती चालू झाली आहे.’’

१. नंदकिशोर गुर्जर यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हटले होते की, मद्यपान करणार्‍या किंवा मांसाहार करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला लोणी नगर पंचायतीची उमेदवारी दिली जाणार नाही. नेता दारू पिऊन बलात्कार करणारा, लुटमार करणारा किंवा स्वतःला जंगली पशू म्हणणारा असू नये. अशा लोकांची लोणीत काहीच आवश्यकता नाही.

२. देहलीमध्ये वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी गुर्जर म्हणाले होते की, आम्ही कुणाला छेडत नाही; पण कुणी आमच्या माता-भगिनींची छेड काढली, तर आम्ही त्यांना सोडत नाही. आम्ही जिहादींना मारणार, नेहमीच मारणार.

३. मार्च २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर गुर्जर म्हणाले होते की, लोणी क्षेत्रात अनुमतीविना मांसविक्रीचे एकही दुकान चालू होणार नाही. मांस विक्रेत्यांनी त्यांची दुकाने तत्काळ बंद करावीत. आम्ही लोणीला लंडन बनवू.