सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – २५ डिसेंबर २०२२ या दिवशी राजवाडा येथील गांधी मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतरची आढावा बैठक पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी ग्रामस्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार केला.
या वेळी शहर आणि उपनगर येथील माहुली, शाहूपुरी, दिव्यनगरी, कोंढवे, सैदापूर, रामनगर-वर्ये, कोडोली आदी ठिकाणी छोट्या स्वरूपातील हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. बैठकीत सभांसाठीचे नियोजन, प्राथमिक स्वरूपाच्या बैठका, प्रसार-प्रचार नियोजन यांविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. या आढावा बैठकीसाठी शहर आणि उपनगर येथील धर्माभिमानी हिंदूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बैठकीचे सूत्रसंचालन सौ. रूपाली महाडिक यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. हेमंत सोनवणे यांनी केले.