विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी या दिवशी !

विधानसभेत १२ विधेयके संमत, १०६ लक्षवेधी, तर ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा !

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची ३० डिसेंबर या दिवशी सांगता झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या अधिसूचनेने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्याचे घोषित केले. वर्ष २०२३ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी या दिवशी मुंबई येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभेत एकूण १०६ लक्षवेधी, तर ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा झाली.

हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेचे कामकाज एकूण ८४ घंटे १० मिनिटे इतका वेळ झाले. लोकप्रतिनिधींनी केलेला गोंधळ, सभात्याग आदी विविध कारणांमुळे सभागृहाच्या कामकाजाची ८.३१ मिनिटे वाया गेली. नियमितचे सरासरी कामकाज ८.२५ मिनिटे चालले. विधानसभेसाठी एकूण ६ सहस्र ८४६ तारांकित प्रश्न आले होते. त्यांतील ४२२ प्रश्न स्वीकृत झाले. त्यांतील केवळ ३६ प्रश्नांवर चर्चा झाली. अल्पकालीन चर्चेसाठी ६ प्रस्ताव आले होते. त्यांतील १ प्रस्ताव स्वीकारण्यात आला. एकूण २ सहस्र २८ लक्षवेधी आल्या होत्या. त्यांतील ३३३ लक्षवेधी स्वीकृत झाल्या. त्यांतील १०६ लक्षवेधींवर चर्चा झाली. विधानसभेत एकूर १२ विधेयके मांडण्यात आली. ही सर्व विधेयके संमत करण्यात आली. ५ अशासकीय विधेयकांपैकी २ संमत करण्यात आली. विधानसभेमध्ये एकूण सदस्यांची सरासरी उपस्थिती ७९.८३ टक्के इतकी होती.