‘गलेलठ्ठ वेतनाची नोकरी असावी आणि अल्प काम असावे’, असा विचार अनेकांच्या मनात घुटमळत असतो; मात्र तसे होत नाही. पुष्कळ काम आणि गलेलठ्ठ वेतन, तसेच पुष्कळ काम अन् तुटपुंजे वेतन अशी दोन भिन्न समीकरणे या व्यावसायिक जगात आहेत.
कामाचा भार असला, तरी वेतन चांगले आहे. त्यामुळे कुरकुर न करता निमूटपणे काम केले जाते. यामुळे हा वर्ग उंची राहणीमान जगत असतो. त्यात उच्चभ्रू वस्तीत घर घेणे, मुलांना महागड्या शाळेत प्रवेश घेणे, दुचाकी-चारचाकी घेणे, सुट्टीमध्ये देशातील पर्यटनस्थळी वा विदेशात सहलीला जाणे, मासातून अनेकदा उपाहारगृहात भोजन करणे, तसेच अन्य वेळीही तिथूनच घरी जेवण मागवणे आदी सूत्रे यात येतात. अशी सुखमय जीवनशैली असते. ‘पैशांचा सतत व्यय होत असल्याने त्याचा पुन्हा संचय होण्यासाठी काम केलेच पाहिजे अन्यथा आपले कसे होणार ? पुष्कळ काम करण्याचे हेच वय आहे. त्यामुळे आता भरमसाठ कमवायचे आणि नंतर आरामात काम करायचे’, अशी मानसिकता लक्षात येते. पैसा आणि काम या व्यतिरिक्त कुठेच बघण्याची उत्सुकता नसल्याने कायम त्या दिशेनेच मार्गक्रमण होत रहाते. आयुष्यात काय कमावले ? अमाप पैसा आणि त्यामुळे आलेली मालमत्ता, दागिने, विलासी जीवन इत्यादी, तसेच कामाचा असलेला मानसिक ताण. परिणामी शरिराची होणारी प्रचंड ओढाताण आणि त्यायोगे होणारे आजार यांमध्ये केव्हा गुरफटतो ? याचा थांगपत्ता लागत नाही, तरीही पैसे कमवण्याच्या ध्येयापासून जराही मागे हटत नाही. रेटून जेवलो, तरी आवश्यक तितकीच ऊर्जा शरीर घेते. बाकीचे वाया जाते आणि त्याचा अवयवांवर ताणही येतो. पैशांचेही तसेच आहे.
पैसा दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असला, तरी त्याचा हव्यास स्वस्थ बसू देत नाही. अतिरिक्त असलेला पैसा चिंतेचे कारण बनतो. परिणामी प्रसंगी कौटुंबिक वाद होतात. त्यामुळे जीवनाच्या उतारवयातील आरामाच्या क्षणी कलहाला तोंड द्यावे लागते आणि कुटुंब, नाती दुभंगतात. सायबर, भुरटे चोर यांची टांगती तलवार असते ती निराळीच. ‘आवश्यक तितकाच धनसंचय करूया आणि निःस्वार्थी हेतूने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करणार्या संतांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी झटूया’, असा विचार करणारे दुर्मिळ आहेत; पण जे या मार्गाने जीवनाचा प्रवास करतात, ते नक्कीच आनंदी होतात. त्यामुळे मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी केवळ पैशांचा हव्यास नको !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.