भारतातातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार !

‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक एन्.आर्. नारायण मूर्ती यांचे परखड मत !

‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक एन्.आर्. नारायण मूर्ती

अमरावती (आंध्रप्रदेश) – भारतातील वास्तव म्हणजे ‘भ्रष्टाचार, घाणेरडे रस्ते, प्रदूषण आणि बहुतेक वेळा सत्तेचा अभाव’, असे आहे; मात्र सिंगापूरमधील वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, स्वच्छ पर्यावरण आणि लोकांकडे असणारी सत्ता, असे परखड प्रतिपादन ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक एन्.आर्. नारायण मूर्ती यांनी केले. ते आंध्रप्रदेशमधील विझियानगरम् जिल्ह्यातील राजम भागात असणार्‍या ‘जी.एम्.आर्. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी’ या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते.

१. नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, तरुणांनी समाजात पालट घडवण्याच्या दृष्टीने स्वतःची मानसिकता घडवायला हवी. आपल्या स्वत:च्या हिताच्याही आधी लोकांचे, समाजाचे आणि देशाचे हित समोर ठेवायला हवे.

२. आपण सगळ्यांनीच कोणत्याही कमतरतेकडे ‘पालटाची एक संधी’ म्हणून पाहिले पाहिजे. इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पहाण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वतः नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही नारायण मूर्ती यांनी केले.

संपादकीय भूमिका

हे वास्तव भारतियांनी स्वीकारले असून ‘ते कधीही पालटता येणार नाही’, हेही स्वीकारले आहे. ही पराभूत मानसिकता पालटण्यासाठी जनतेने याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे !