पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर – महाराष्ट्रात लवकरच ‘हायस्पीड रेल्वे’ होणार आहे. त्याचसमवेत पुढच्या एका मासात नागपूर विमानतळाच्या भूमीपूजनासाठीही आम्ही तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना) बोलावणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कार्यक्रमाचे आमंत्रण मोदी यांना दिले.

ते म्हणाले की, २० वर्षांपूर्वी नागपूर ते मुंबई महामार्ग व्हावा, असे स्वप्न पाहिले होते; पण आता ते पूर्ण झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळेच हे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. जेव्हा समृद्धी महामार्गाचा विचार झाला, तेव्हा केवळ एका व्यक्तीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांना विश्वास होता की, मी महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत आहे. ते कार्य लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला जाणूनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काही लोकांचा उल्लेख करायचा आहे. समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आमचे राधेश्याम मोपलवार, मनोज सौनिक, प्रवीण परदेशी आणि गायकवाड या शासकीय अधिकार्‍यांचा मोलाचा वाटा होता. ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही, त्यांची मी क्षमा मागतो; मात्र या पथकाने जे काम केले, ते पुष्कळ मोठे आहे. त्यांच्या कामामुळेच हा महामार्ग होऊ शकला.