कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून ५ लाखांचे अर्थसाहाय्य !
चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा ‘प्री कास्ट स्लॅब’चा भाग तुटल्याने १३ प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी (वय ४८ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर इतर १२ जणांवर उपचार चालू आहेत. ही दुर्घटना २७ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता घडली होती. अपघातातील गंभीर घायाळांसाठी १ लाख आणि किरकोळ घायाळ झालेल्यांसाठी ५० सहस्र रुपये रेल्वेने घोषित केले आहेत. हा पादचारी पूल ६० फूट उंच असून त्याची ४० वर्षांपूर्वी उभारणी करण्यात आली होती.
मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. घायाळ झालेल्या प्रवाशांवर शासकीय व्ययाने योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घायाळ प्रवाशांची विचारपूस केली.