पुणे येथील नवले पुलावर २० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या साखळी अपघातात एका भरधाव टँकरने ४८ पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने अनेक वाहनांची मोठी हानी झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वर्ष २०१२ पासून आतापर्यंत या ठिकाणी ९० हून अधिक अपघात झाले आहेत. अपघात झाल्यानंतर प्रत्येक वेळी प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी केली जाते; पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता झालेल्या या अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का ? असा संतप्त प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असेच सूज्ञ नागरिकांना वाटते.
बेंगळुरू-मुंबई बाह्य वळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्गाभोवती नागरिकीकरण अफाट झाल्यानंतर हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. सतत होणार्या अपघातांमुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्ष २०१४ पासून आतापर्यंत दरी पूल-नवले पूल आणि धायरी पूल या साडेतीन कि.मी.च्या अंतरात जवळपास १८५ अपघात झाले असून यामध्ये ६६ जणांचा मृत्यू अन् १४५ जण घायाळ झाले आहेत. यामध्ये तीव्र उतार हेच येथील अपघाताचे प्रमुख कारण आहे. या उतारावर अवजड वाहनांचे नियंत्रण सुटते. ‘स्पीडगन’ दिसल्यावर वाहनाचा वेग अचानक अल्प होतो, परिणामी मागच्या गाड्या येऊन पुढील वाहनांना जोरदार धडक देतात. वर्ष २०१३ मध्ये या रस्त्याचे ६ पदरीकरण होणार होते; मात्र अद्याप याचे कामही चालू झालेले नाही.
अपघाताची कारणे कोणतीही असली, तरी जनतेच्या जिवाचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन प्रशासकीय चुका सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मुख्य उतार अल्प करणे, २ गाड्यांमधील अंतर, विविध ठिकाणी ‘रम्बल स्ट्रिप्स’ (लहान उंचीचे अनेक गतीरोधक) आणि ‘रिफ्लेक्टर’ बसवणे आदी उपाययोजनांसह जनतेला वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक करायला हवे. अन्य देशांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर कारवाईचे प्रावधान (तरतूद) आहे. तिथे ‘लाच देणे’ हा भारतीय प्रकार नाही. वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश हवा. यामुळे नव्या पिढीवर वाहतुकीचे नियम आणि शिस्त यांचे संस्कार होतील, तसेच प्रत्येकाला आपल्या प्राणाची अन् इतरांच्या प्राणाची किंमत असणेही महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रबोधन शालेय जीवनातून होणे आवश्यक !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे