हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

निपाणी येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष

वाहनफेरीत सहभागी धर्मप्रेमी

निपाणी – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे २७ नोव्हेंबर या दिवशी म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बी.पी. रोड येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी २५ नोव्हेंबर या दिवशी वाहनफेरी काढण्यात आली. या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्‍या घोषणा यांमुळे अवघे निपाणी भगवेमय झाले होते. फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती शिवाजी चौक येथे भाजपच्या नगरसेविका सौ. कावेरी मिरजे आणि श्री. सागर मिरजे यांच्या हस्ते हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस हार अर्पण करण्यात आला. या वेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, तर जत्राट येथील ह.भ.प. श्रीधर महाराज यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर बेळगाव नाका, छत्रपती संभाजीराजे चौक, कित्तूर चेन्नम्मा सर्कल, महादेव मंदिरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहनफेरीची समाप्ती झाली. फेरीच्या कालावधीत कित्तूर राणी चेन्नम्मा यांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आला.

विविध चौकांमध्ये फेरीचे स्वागत करण्यात आले. फेरीच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना संबोधित करून २७ नोव्हेंबर या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, नांगनूर येथील श्री संप्रदायाचे श्री. सुरेश गुरव, निपाणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. नीता बागडे, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांनी सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.