मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण होईल ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्‍वासन

उद्योगमंत्री उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – चर्नीरोड येथे मराठी भाषाभवन आणि नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्राच्या इमारतींची पायाभरणी येत्या एका मासात होईल, तर पुढील २ वर्षांत मराठी भाषाभवनाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारकडून मराठी भाषाभवनासाठी १२६ कोटी रुपये, तर उपकेंद्रासाठी २६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या दोन्ही इमारतींचे काम करण्यात येणार आहे. कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा २ सहस्र वर्षांपूर्वीची असावी लागते. मराठी भाषा तर २ सहस्र ३०० वर्षांपूर्वीची आहे. याविषयीची कागदपत्रे महाराष्ट्र सरकारकडून केंद्रशासनाला सादर करण्यात आली आहेत. यासाठी आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल.’’

मंदिरात जाऊन नतमस्तक होणे, ही अंधश्रद्धा नाही !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौहत्ती येथील श्री कामाक्षीदेवीचे दर्शन घेतले. त्यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर सामंत म्हणाले, ‘‘मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया पडणे कुणाला जर रुचत नसेल, तर ही धर्माची चेष्टा आहे. मंदिरात जाऊन नतमस्तक होणे, ही अंधश्रद्धा नाही. देवासमोर नतमस्तक होण्यात वावगे काय आहे ? जे सकाळी पत्रकार परिषद घेतात, ते सायंकाळी मंदिरात जाऊन नमस्कार करतात. देवळात जाऊन नमस्कार करण्यात चुकीचे काय आहे ?’’