मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विद्यापिठांचा समावेश
नागपूर – भारतात लागू होणार्या नवीन शैक्षणिक धोरणात स्थानिक भारतीय भाषांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (‘यूजीसी’ने) नुकतेच विद्यापिठासह सर्व शैक्षणिक संस्थांना ११ डिसेंबर या दिवशी ‘भारतीय भाषा दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला; मात्र या भाषा शिकवण्यासाठी विद्यापिठात पूर्णवेळ शिक्षकांचाच अभाव आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश चांगला असला, तरी प्राध्यापक भरतीअभावी ही उद्देशपूर्ती होणे असंभव आहे.
१. मुंबई, पुणे आणि नागपूर अशा मोठ्या विद्यापिठांमध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, पाली, प्राकृत यांसह इतर अनेक भाषा शिकवल्या जातात; मात्र या विभागांमध्ये केवळ बोटावर मोजण्याइतके नियमित प्राध्यापक असून कंत्राटी प्राध्यापकांच्या भरवशावरच काम चालू आहे.
२. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांना विशेष महत्त्व देत ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी, तमिळ, बंगालीसह ५ भाषांमधून देणे चालू केले आहे. महाराष्ट्र सरकारनेही वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय घेतला आहे.
३. ‘भारतीय भाषा दिना’दिवशी विद्यार्थ्यांना भारतीय भाषांची माहिती देणे, त्यांना भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि भाषेविषयी जनजागृती करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
संपादकीय भूमिकाअसे असेल, तर विद्यार्थी भाषासंपन्न कसे होणार ? नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत नियमित प्राध्यापक भरतीसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे ! |