धारवाड (कर्नाटक) – राज्यात शासकीय सवलतींपासून वंचित राहू नये, यासाठी विश्वकर्मा जातीतील हिंदू इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारत आहेत, अशी धक्कादायक माहिती राज्यातील विधान परिषदेतील भाजपचे आमदार के.पी. नंजुंडी यांनी दिली. विश्वकर्मा समाजाला अधिक आरक्षण देण्याच्या संदर्भात समाजात जागृती करण्यासाठी नंजुंडी धारवाड येथे आले होते. या वेळी उपस्थित पत्रकारांना संबोधित करतांना ते म्हणाले की, कितीतरी ठिकाणी आमच्या समाजातील लोक अन्य धर्मांत धर्मांतरित होत आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे.
‘तुम्ही हे धर्मांतर का रोखत नाही ?’ या प्रश्नावर ते म्हणाले की, मी केवळ विधान परिषदेतील एक आमदार आहे. माझ्या हातात त्यांना रोखण्याचा कोणताही अधिकार आहे ? मी ‘विश्वकर्मा अभिवृद्धी निगमा’साठी आंदोलन केले आहे. सध्या ५ मासांपासून निगम रिक्त आहे. तिथे भरती झालेली नाही. आमच्यातील अनेक जण मुसलमान अथवा ख्रिस्ती होत असून त्यांना थांबवता येत नाही. त्यांना त्यासंदर्भात विचारल्यास ते म्हणतात, ‘आम्हाला खायला नाही; म्हणून आम्ही धर्मांतर करतो. तुमचे सरकार खायला घालेल का ?’ जगण्यासाठी आवश्यक अन्न नसले, तर दुसरीकडे जावे लागेलच ना ? आम्ही आमच्या परंपरागत व्यवसायावर अवलंबून राहून शोचनीय अवस्थेला पोचलो आहोत. सामाजिक न्यायापासून वंचित झालेल्या विश्वकर्मा समाजाची ही स्थिती आहे, असेही नंजुंडी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचेच हे फलित ! स्वातंत्र्योत्तर काळात सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंना साधना शिकवली असती, तर हिंदूंवर अशी परिस्थिती ओढवली नसती, हे लक्षात घ्या ! |