भ्रमणभाष : लाभ कि हानी ?

जगात भ्रमणभाष वापरण्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. अशाच एका सर्वेक्षणानुसार भारतीय लोक प्रतिदिन ४ घंटे भ्रमणभाष वापरतात. सध्या समाजात भ्रमणभाषचा वापर करणे लाभदायी कि हानीकारक ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे; कारण नाशिक येथे गेल्या ५ वर्षांत १० सहस्र १४ घटस्फोट झाले आहेत. याचे मुख्य कारण भ्रमणभाष ठरत आहे, तसेच ‘व्हॉट्सॲप’सह इतर सामाजिक माध्यमांमुळे पत्नी-पत्नींमधील वाढत जाणारी भांडणेही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत.

समाजतज्ञही भ्रमणभाषच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. या सूत्राला धरून वेगवेगळी सर्वेक्षणे जगभर होत आहेत. त्यांचेही निष्कर्ष काहीसे नकारात्मकच आढळतात. यातून विज्ञानाची प्रगती मनुष्याला लाभदायी कि हानी करणारी ? याचा विचार करायला लावणारी आहे. ‘भ्रमणभाष वापराचे मुलांवर होणारे दुष्परिणाम’, हा जागतिक अभ्यासाचा विषय आहे. बांशी (यवतमाळ) ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांच्या भ्रमणभाष वापरावर बंदी घातली आहे. दुसरीकडे मोहित्यांचे वडगाव (सांगली) येथे प्रतिदिन सायंकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत गावात ‘इलेक्ट्रॉनिक गॅझेट’ (उपकरणे) वापरावर बंदी आहे. भ्रमणभाष वापराने मुलांवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात, हे आता सर्वज्ञात आहे. मानसोपचारतज्ञही याकडे सातत्याने लक्ष वेधून घेत असतात.

भ्रमणभाष आल्यामुळे काम असो वा नसो त्याचा अतीवापर चालू झाला आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप अशा विविध सामाजिक माध्यमांतून तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येऊन पुढे त्यांची प्रेमप्रकरणे चालू होतात. यातूनच समाजात पुष्कळ प्रमाणात ‘लिव्ह इन रिलेशिनशिप’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या अनैतिक गोष्टी घडत आहेत, तसेच याला विवाहित अन् घटस्फोटीत महिलाही अपवाद नाहीत. याखेरीज भ्रमणभाषवर ‘ऑनलाईन’ व्यवहार करतांना आतापर्यंत तरुण, महिला आणि वयोवृद्ध लोक यांच्या फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणही वाढत आहे. भ्रमणभाषमुळे व्यवहारात जेवढा लाभ होतो, तेवढाच तोटाही होत आहे. यातून एक भाग अधोरेखित होतो, तो म्हणजे विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी त्याचा वापर करण्यासाठी मनुष्याने विवेकी असणे आवश्यक आहे. मनुष्याचा विवेक जागृत रहाण्यासाठी धर्माचरण आवश्यक आहे. अन्यथा, मन अनावश्यक गोष्टींकडे कसे धावते, हे भ्रमणभाषच्या वापरातून समोर आलेले आहे.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई