कर्नाटक सरकारची गायींना दत्तक घेण्यासाठी ‘पुण्यकोटी दत्तू योजना’ !

  • सामान्य जनताही घेऊ शकते गायींना दत्तक !

  • योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचे वेतन घेणार !

(चित्रावर क्लिक करा)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजप सरकारने गोवंशियांच्या रक्षणासाठी ‘पुण्यकोटी दत्तू योजना’ प्रारंभ केली आहे. या योजनेच्या अंतर्गत भटक्या गायींना संरक्षण देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांकडून नाव्हेंबर मासातील एक दिवसाचे वेतन घेण्यात येणार आहे. त्यांच्या वेतनातून परस्पर ही रक्कम वगळून घेण्यात येणार आहे. जे कर्मचारी वेतन देऊ इच्छित नाहीत, त्यांनी त्यांच्या विभाग प्रमुखाकडे लिखित स्वरूपात कारण देण्यास सांगण्यात आले आहे. या वेतनातून ८० ते १०० कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता आहे.

या योजनेद्वारे गायींना दत्तक घेऊन त्यांचे पालन-पोषण करण्याची सुविधा आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आतापर्यंत १०० गायींना दत्तक घेतले असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यातील विविध गोशाळांमध्ये दत्तक घेण्यासाठी १ लाख गायी आहेत. एका वर्षासाठी गाय दत्तक घेतल्यास तिच्या पालन-पोषणावर ११ सहस्र रुपये खर्च येणार आहे.

संपादकीय भूमिका

योजनेसाठी सरकारने लोकप्रतिनिधींकडूनही एक दिवसाचे वेतन घेतले पाहिजे किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीला किमान १ गाय दत्तक घेण्यास सांगितले पाहिजे, असेच गोप्रेमींना वाटते !