गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता यांसंबंधी एकही तक्रार नसणे चिंताजनक ! – आशिष कुमार, अधीक्षक, ‘सी.बी.आय.’ (भ्रष्टाचारविरोधी पथक)

पत्रकार परिषदेत ‘सी.बी.आय.’चे अधीक्षक आशिष कुमार (डावीकडील)

पणजी, २ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता आदींच्या विरोधात एकही तक्रार आलेली नाही, ही एक चिंताजनक गोष्ट आहे, असे मत ‘सी.बी.आय.’चे अधीक्षक आशिष कुमार यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दक्षता जागृती सप्ताहाच्या निमित्ताने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 (सौजन्य : Goa 365 TV)

अधीक्षक आशिष कुमार पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात केंद्रीय खात्यांची विविध कार्यालये आहेत; मात्र त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नसणे याचा अर्थ ‘भ्रष्टाचार होत नाही’ असा होतो. नागरिक लाच देण्यास सिद्ध असतात. त्यांना तक्रार करायची नसते. गोव्यात उच्चपदस्थ अधिकार्‍यांची नेमणूक होते आणि ते गोव्यात महागडी घरे घेत असतात, तसेच अधिकोषातही काही वेळा कर्ज देण्यासाठी अर्जदाराकडून अधिकोषातील अधिकारी लाच घेत असतात; मात्र कुणीही त्याविषयी तक्रार करत नाही. कदाचित् लोक घाबरत असावेत; परंतु नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी लेखी तक्रार देणे अत्यावश्यक नाही. केवळ ‘सी.बी.आय.’ला याविषयी माहिती दिल्यासही योग्य ती कारवाई केली जाईल. पत्रकार जनतेशी अधिक संपर्कात येत असतात आणि यामुळे पत्रकारांनी भ्रष्टाचार रोखण्याविषयी समाजात जागृती करावी.’’

—————————————————————–

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !