अन्य कोणत्याही इस्लामी देशांमध्ये मिळत नाही, इतके भारतातील मुसलमानांना स्वातंत्र्य !

आय.ए.एस्. अधिकारी शाह फैसल यांचा मुसलमानांना घरचा अहेर

आय.ए.एस्. अधिकारी शाह फैसल

नवी देहली – भारतात मुसलमानांना समान नागरिकांचा दर्जा मिळत आहे. अन्य कोणत्याही इस्लामी देशांमध्ये मिळत नाही. इतके स्वातंत्र्य भारतातील मुसलमानांना आहे, असे ट्वीट भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शाह फैसल यांनी केले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची नियुक्ती झाल्यावरून त्यांनी हे ट्वीट केले.

शाह फैसल यांनी पुढे म्हटले की, ऋषी सुनक यांची नेमणूक आपल्या शेजार्‍यांसाठी आश्‍चर्याचा धक्का असू शकतो. जेथे घटनेनुसार केवळ मुसलमान व्यक्तीच सरकारमधील सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते; पण भारतीय लोकशाही जातीय, तसेच धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. काश्मीरमधील एक तरुण नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होतो, सरकारमध्ये उच्च पदावर जातो, त्यानंतर सरकारपासून विभक्त होतो आणि पुन्हा तेच सरकार त्याला पुन्हा सेवेत घेते, हे केवळ भारतात होऊ शकते. मला  प्रत्येक पावलावर देशात आदर आणि पाठिंबा मिळाला आहे. मौलाना आझाद यांच्यापासून ते डॉ. मनमोहन सिंह, झाकीर हुसेन, द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत प्रत्येकाला या देशात समान संधी आहे. मी स्वत: सर्वोच्च पदावर पोचून हे अनुभवले आहे.

शाह फैसल यांचा परिचय

शाह फैसल हे वर्ष २००९ मधील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिक गुण मिळालेले अधिकारी आहेत. त्यांनी जानेवारी वर्ष २०१९ मध्ये त्यागपत्र देत सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता. केंद्र सरकारकडून ‘काश्मीरमधील नागरिकांच्या होणार्‍या हत्या, मुसलमानांच्या हक्कांकडे दुर्लक्ष आणि सार्वजनिक संस्था नष्ट’ करण्याच्या निषेधार्थ त्यागपत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ‘जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (जे.के.पी.एम्.)’ पक्षाची स्थापना केली होती. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रहित केल्यानंतर फैसल यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कह्यात घेण्यात आले होते.