परतीच्या पावसाने झालेल्या हानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

श्री. दीपक केसरकर

कोल्हापूर – जे लोकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे, ते सरकार घेत आहे. याची कार्यवाही तात्काळ होत आहे. शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या अधिकोषात जमा होत आहेत. दीपावलीच्या कालावधीत परतीच्या पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. याचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात हे पंचनामे उपग्रहाद्वारे करण्यात येतील. जेणेकरून यात जाणारा वेळ वाचेल. यानंतर शेतकर्‍यांना साहाय्यही तात्काळ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापुराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

१. म्हैसूर येथे होणारा दसरा हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला. तो पहायला परदेशी पर्यटक येतात. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा या ठिकाणी आहे. त्यामुळे येथील दसराही यापुढील काळात राष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. येणार्‍या तीन-चार मासांत आम्ही कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू.

२. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असले, तर त्याचा लाभ होतो. त्यामुळे जनतेची विकासकामे तात्काळ होतात. यामुळेच राज्यशासनाने केंद्राकडे पाठवलेला १२ सहस्र कोटी रुपयांचा विविध विकासकामांचा निधी तात्काळ संमत करण्यात आला आहे.

३. बागायतदार शेतकर्‍यांसाठी ‘एशियन डेव्हलमेंट बँके’कडून एक मोठा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून बागायतदार शेतकर्‍यांनी घेतलेले उत्पन्न आणि त्याची साठवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

४. शेतकर्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये. भूविकास बँकेतील ९७० कोटी रुपयांचे कर्ज आम्ही माफ केले आहे. या बँकेत जे कर्मचारी होते, त्यांची थकीत देणीही आम्ही दिली आहेत.