सध्या दिवाळी साजरी करण्याचे पालटलेले स्वरूप, म्हणजे कष्ट करावे लागू नयेत, यासाठी काढलेली पळवाट !

सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब कबिला (काही कुटुंबे) कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी (‘हिल स्टेशन’वर) मांसाहारादी चापायला निघून जातो. नातेवाईक घरी यायला नकोत आणि दिवाळीचा फराळ बनवायला नको, यांसाठी काढलेली ही युक्ती भलतीच लोकप्रिय झालेली आहे. घरी स्वच्छता करून पणत्या आणि आकाशकंदिल लावायचा. श्रीविष्णु, श्रीकृष्ण, श्री लक्ष्मीदेवी, श्री कुबेर आणि यम यांचे त्या त्या तिथीनुसार पूजन करणे, हे आता बुरसटलेपणाचे मानले जाऊ लागले आहे. पहाटे स्नान करणे, चिरोटे फोडणे, दिवाळीचा वैशिष्ट्यपूर्ण फराळ सहकुटुंब सेवन करणे यांना आता बुट्टी दिली जाते. चाकरीला जाण्याच्या निमित्ताने प्रतिदिन पहाटे उठावे लागते. याउलट दिवाळीला सुटी असते; म्हणून कुणी लवकर उठत नाही आणि त्या मंगलस्नानाचे अप्रूप कुणाला उरलेले नाही. बहुतेक महिला चाकरी (नोकरी), व्यवसाय करू लागल्याने त्यांना दिवाळीला घरी फराळ बनवणे, हे संकट वाटते. त्यापेक्षा अशा महिलांचा ओढा ‘घरगुती’ नावाखाली गृहउद्योगवाली मंडळी फराळ करून विकतात, त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्याकडे आहे. कोणते धार्मिक नियम पाळायचे ? यांच्याशी कुणाला देणे-घेणे उरलेले नाही.

– श्री. संजीव नरेंद्र पाध्ये