लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन

१. तिथी : आश्विन अमावास्या

२. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.

अ. अमावास्या : ‘या दिवशी दिव्यांचा झगमगाट शोभून दिसतो. त्यामुळेच अमावास्या ही पवित्र झाली आहे. शरदऋतूतील आश्विन मासातील पौर्णिमा तशीच ही अमावास्याही कल्याणकारी आहे. सर्व समृद्धीदर्शक आहे.’

– परात्पर गुरु पांडे महाराज

३. इतिहास

या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

४. सण साजरा करण्याची पद्धत

‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

४ अ. लक्ष्मीपूजन

एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून सिद्ध केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

४ आ. श्री लक्ष्मीदेवीला करायची प्रार्थना

लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभरातील जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि श्री लक्ष्मीदेवीला प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे. माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो. हे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या’

४ इ. लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन

आश्विन अमावास्येस लक्ष्मी आणि कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. कुबेर ही देवता ‘पैसा कसा राखावा ?’, हे शिकवणारी आहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी आणि कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. विशेषतः व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात करतात.

४ ई. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात.

४ उ. अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे.

४ ऊ. हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. (हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात.) ब्राह्मण आणि अन्य क्षुधापीडित यांना भोजन देतात.

४ ए. अलक्ष्मी निःसारण

१. महत्त्व : गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.

२. कृती : ‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. केवळ या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)