राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : योगासने आणि मल्लखांब !

वर्ष १९२४ मध्ये लाहोर येथे ‘अखिल भारतीय ऑलिंपिक स्पर्धा’ या नावाने आणि त्यानंतर वर्ष १९४० पासून ‘राष्ट्रीय खेळ’ (नॅशनल गेम्स) या नावाने या स्पर्धांना प्रारंभ झाला. या वर्षी कर्णावती (गुजरात) येथे ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’मध्ये आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १२८ सर्वोच्च पदके प्राप्त केली. यात ३४ सुवर्ण, ३७ रौप्य, ५७ कांस्य पदकांचा समावेश आहे. सैन्यदलाला ५३ सुवर्ण पदकांसह (३३ रौप्य, २९ कांस्य) एकूण ११५ पदके मिळूनही सुवर्ण पदकांमुळे तो संघ पदतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ३६ क्रीडा प्रकारांत देशभरातून ७ सहस्र खेळाडू सहभागी झाले होते. यापूर्वी वर्ष २०१५ मध्ये केरळ येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या. त्यानंतर ७ वर्षांनी गुजरातमध्ये पार पडल्या. गुजरातने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच यात मल्लखांब आणि योगासने यांचा समावेश करण्यात आला. ‘मल्लखांब’ म्हणजे न्यूनतम वेळात शरिराच्या प्रत्येक भागाला अधिकाधिक व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार ! मल्लखांबावरील कसरतींमुळे शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळता, संतुलन, साहस इत्यादी गुण वाढीस लागतात. आपल्या हाता-पायांचे पंजे, मांड्या, पोटर्‍या, दंड, खांदे यांच्या आतल्या संस्था फार कार्यक्षम होतात, तसेच पोटाचे स्नायू, बरगड्या, पाठीचा कणा बळकट होण्यास साहाय्य मिळते. मल्लखांबामुळे केवळ शारीरिक विकासच नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यही उत्तम रहाण्यास साहाय्य मिळते. योगासनांविषयी सर्वांना ठाऊकच आहे. योग हा आपल्या जीवनातील अनमोल भाग आहे. शरीर योग्य प्रकारे संतुलित आणि निरोगी ठेवण्यासाठी योग आवश्यक आहे. ७० टक्के आजार आणि रोग हे योगासने केल्याने बरे होतात. इच्छाशक्तीमुळे आपण अनेक रोगांवर मात करू शकतो. आपली इच्छाशक्ती ही योग आणि योगासन केल्याने वाढते. यामुळे योगासनांचे पुष्कळ लाभ आहेत. योगासनाने विचारही अल्प होऊन मन शांत रहाते. एकूणच या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मल्लखांब आणि योगासने यांचा अंतर्भाव करण्याचे उचलले पाऊल स्तुत्यच आहे. अशाच प्रकारे भारतीय खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याविषयीचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव