हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निफाड (नाशिक) येथे आयोजित ‘हिंदूसंघटन मेळावा’ !

श्री. चेतन राजहंस

नाशिक, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला. वर्ष १९७६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द घुसडले. भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, संवैधानिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते निफाड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्याच्या वेळी बोलत होते. मेळाव्याला समितीच्या वतीने श्री. गौरव जमधडे आणि श्रीमती वैशाली कातकडे यांनी संबोधित केले.

‘वक्फ बोर्डा’च्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारणे काळाची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन श्री. गौरव जमधडे यांनी केले. या वेळी समितीच्या गेल्या २० वर्षांतील कार्याचा परिचय आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांच्या ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या.

मेळाव्यात प.पू. महंत जनेश्वरनंदगिरी महाराज, प.पू. महंत महेशगिरी महाराज दत्त, प.पू. कृष्णानंद महाराज कपाटे महाराज, लासलगाव येथील जनार्दन स्वामी, अनाथ आश्रमाच्या संचालिका सौ. संगीतामाई दिलीप गुंजाळ, तसेच ओझर येथील श्री. ज्ञानेश्वर आढाव आणि श्री. गोविंद चौरे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला.