‘पी.एफ्.आय.’वरील कारवाईवर विरोधकांचे मौन का ? – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

केशव उपाध्ये

मुंबई – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टरवादी संघटनेवर केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईमुळे देशात धार्मिक विद्वेष आणि आतंकवाद माजवण्याचा कट उघड झाला आहे. या कारवाईनंतर लांगूलचालनवादी (विरोधी) पक्षांनी बाळगलेले मौन चिंताजनक आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ‘विरोधकांनी क्षुद्र राजकारण बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेविषयी सर्व राजकीय पक्षांचे ऐक्य असल्याचे दाखवून द्यावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपाध्ये यांनी पुढे म्हटले आहे की, मुसलमान मतांवर डोळा ठेवून त्यांचे लांगूलचालन करण्याची शिवसेना पक्षप्रमुखांची नीती गटनेत्यांच्या मेळाव्यातच स्पष्ट झाली आहे; मात्र पी.एफ्.आय.वरील कारवाई ही कोणत्याही धर्माच्या विरोधातील कारवाई नसून आतंकवाद आणि फुटीरतावाद याला खतपाणी घालणार्‍या व्यापक कटाच्या विरोधातील कारवाई आहे. हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून मुसलमानांच्या मतांवर डोळा ठेवण्याचे दुहेरी राजकारण करणार्‍या उद्धव ठाकरे यांनी या कारवाईवर मौन का पाळले ?, असा प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

संपूर्ण देश पी.एफ्.आय.च्या विघातक कारवायांची उकल करणार्‍या अन्वेषण यंत्रणांच्या पाठीशी असतांना क्षुल्लक राजकारणापोटी या कारवायांवरच प्रश्नचिन्हे निर्माण करणार्‍या विरोधकांचा हेतू शंकास्पद आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांच्या मंत्रीपदास संरक्षण देऊन ठाकरे यांनी त्यांच्या क्षुद्र राजकारणाचे प्रदर्शन घडवले होते, असा आरोप उपाध्ये यांनी या वेळी केला आहे.