भोर येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात मोर्चा

भोर (जिल्हा पुणे) – पुणे येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशद्रोही कार्यकर्त्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, त्यांचे नागरिकत्व रहित करावे या मागण्यांसाठी भोरवासियांनी शहरात देशद्रोह्यांच्या विरोधात घोषणा देत जाहीर निषेध मोर्चा काढला. २६ सप्टेंबर या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील तरुणांनी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना भोर बस स्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वरील मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी शेकडो भोरवासीय तरुण, तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.